• Tue. Sep 19th, 2023

सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीची तक्रार करण्यासाठी ठोस पुरावे हवेत.!

ByBlog

Jan 9, 2021

नागपूर : सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीची तक्रार करण्यासाठी सुनेने ठोस कारण व पुरावे सादर करायला हवे. क्षुल्लक कारणांसाठी सासरच्या मंडळींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, असे परखड मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले.
अंकिता व अक्षय (नाव बदललेली) यांचा जून २०१२ मध्ये विवाह झाला. दरम्यान, कौटुंबिक कलहामुळे अंकिताने अक्षयपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता तिने अक्षयला दारू व सिगारेटचे व्यसन असल्याचे कारण दिले. त्याशिवाय अक्षय हा शारीरिक संबंध ठेवण्यात सक्षम नसल्याचा दावा अंकिताने केला. त्या आधारावर दोघांचा घटस्फोट झाला. पण, त्यानंतर तिने पोलिसांत सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. त्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश अकोला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या प्रकरणावर अकोला सत्र न्यायालयाने स्थगिती दिली असता अंकिताने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचे आरोप करताना सुनेकडे ठोस कारण व पुरावे असायला हवेत. या प्रकरणात अंकिताकडे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवताना क्षुल्लक कारणांसाठी सासरच्या मंडळींना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!