Skip to content

“सावित्री माँ फुले”खडूचा फळ्याचा । लळा सावित्रीला ॥ चला शिक्षणाला । भिडेवाडी ॥
आद्य अद्यापिका । सावित्री माँ फुले ॥ उधळली फुले । शिक्षणाची ॥
पेटवून दिली । शिक्षणाची ज्योत ॥ न्हाले प्रकाशात । अज्ञ जन॥
ज्योत पेटविली । सावित्री जोतीने ॥ शिक्षणाचे गाणे । झोपडीत ॥
करुनी सहन । काटे कुटे शेण ॥ विद्येचे ती दान । करितसे ॥
भिड्यांच्या वाड्यात । अक्षरांचा मळा ॥ सुगंधाचा वाळा । चोहिकडे ॥
ज्ञानाची पणती । लावूनीया गेली ॥ गुणवंत केली । अज्ञपिढी ॥
जोतीबाची ज्योत । एक दीपकळी ॥ निरक्षर कळी । फुलविल्या ॥
स्त्री असो अबला । विधवा दलित ॥ सर्वांचेच हित । बघितले ॥
सावित्री ठिणगी । तम जाळणारी ॥ शोषितांच्या दारी । ज्ञानफुले ॥
जोतीराव संगे । करुनिया कार्य ॥ वृद्धिंगत धैर्य । जीवनात ॥
जवळ करुनी । रंजले गांजले ॥ साक्षर ही केले । बहुसंख्य ॥
सावित्री माँ फुले । मशालीची ज्वाला ॥ चिरे अंधाराला । जीवनात ॥
तुझ्या हृदयात । अक्षरांची खाण ॥ रुढींवर बाण । मारीयले ॥
तुझे कार्य थोर । किती मी गाणार ॥ थोर उपकार । सावित्रीचे ॥
कार्य अनमोल । करितो नमन ॥ कराने वंदन । कोटी कोटी ॥
महात्मा जोतीराव फुले राजस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
-प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
रुख्मीणी नगर, अमरावती. भ्रमणध्वनी : 8087748609
Post Views: 13
Like this:
Like Loading...