• Mon. Sep 25th, 2023

शेतकरी आंदोलनात हिंसाचार..!

ByGaurav Prakashan

Jan 28, 2021

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून तीनशेवर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन हजारांवर आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून दोनशेवर ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रकरणी पोलिसांकडून शेतकरी संघटनांच्या २६ नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात केले आहेत. दिल्ली पोलिस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी राजधानीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी चर्चा करण्यासाठी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
दिल्ली हिंसाचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये दीप सिद्धू याचेही नाव आहे. तसेच शेतकरी नेते योगेंद्र यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी जवळपास २00 जणांना ताब्यात घेतले. या आंदोलनकर्त्यांविरोधात दंगल घडवणे, पोलीस कर्मचार्‍यांवर हल्ले करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या लोकांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात जवळपास ३00 जण जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर उलटल्याने एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. जखमींमध्ये पोलिसांची संख्या मोठी असल्याचेही दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.
ट्रॅक्टर रॅली दरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांकडून अर्शुधुराचा आणि लाठीचार्जचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेडस तोडत राजधानी दिल्लीत प्रवेश केला होता. काही आंदोलकांनी दिल्लीच्या प्रसिद्ध लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला होता. या दरम्यान अनेक पोलीस जखमी झाले होते. तसेच आयकर कार्यालय भागात काही सार्वजनिक आणि खासगी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर सेलकडून तब्बल १000 हून अधिक ट्विटर हँडलची ओळख पटवण्यात आली. या लोकांनी सोशल मीडियावरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हिंसाचारात भूमिका निभावल्याचा पोलिसांना संशय आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!