शिक्षक : उत्तुंग व्यक्तिमत्व

    शिक्षक : उत्तुंग व्यक्तिमत्व
    ज्ञानसागरातून अक्षर मोती
    वेचितो शिष्य अंजलीभरुनी
    चरणी अर्पण गुरुची दक्षिणा
    पुष्पसुमांची ज्ञानार्जन करूनी

“छडी लागे छम छम विद्या येई घम घम” असे म्हणत प्रत्येक चुकांसाठी हातांवर छडी मारून वळ उठवणारे शिक्षक हल्ली दुर्मिळ झालेत. त्याप्रमाणे मार सहन करणारे विद्यार्थीही नाहीत. पूर्वीचे मास्तर धोतर, कोट, टोपी घालून हातात छडी घेऊन वर्गात प्रवेश करायचे, तेव्हा सर्व वर्ग चिडीचूप होऊन जायचा. मास्तर वर्गातून बाहेर जाईपर्यंत मान वर करून बोलायची किंवा खोडी काढायची कुणाची हिंमत होत नसे.फळ्यावर लिहीत असताना मधूनच मास्तर चष्म्यातून कुणाकडे पाहू लागले की तो विद्यार्थी थरथर कापू लागे.त्यांचे व्यक्तिमत्त्व उठावदार तसे त्यांचे शिकवणे ही खूप उच्चतम दर्जाचे.हातचे काहीही राखून न ठेवता ते आपल्या विद्यार्थ्यांना सढळ हाताने आपल्याकडील विद्याधन वाटत.जो विषय ते शिकवायला घ्यायचे त्यात विद्यार्थी तल्लीन होऊन जायचे. जणू काही त्या भूमिकेची अनुभूती घेत आहोत असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटे. त्यामुळे शिक्षकांविषयी आदरयुक्त धाक वाटे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    देती गुरुजनही शिष्यास
    ज्ञानामृताची ही शिदोर

    सुखनैव जीवनासाठीच
    असे ती आयुष्याची दोरी

पुराणकाळापासूनच गुरू नि शिष्याचे नाते सलोख्याचे आणि प्रेमभावाचे म्हणून गौरवले जाते. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे.जीवनात आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही.कारण आम्हांला या सुंदर जगात आणण्याचे श्रेय त्यांचेच असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरू आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे शिक्षकांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान असते. म्हणूनच म्हटले आहे ‘गुरुविण कोण दाखविल वाट’. जीवनातील अडचणी टक्केटोणपे खाण्याची वेळ येऊ नये म्हणून गुरू शिष्याला बालपणापासून योग्य ती दिशा दाखवतात. म्हणून आपल्या जीवनाचे तेच खरे दिशादर्शक आहेत. अशा गुरूंना वर्षातून एक दिवस तरी मानाचा मिळावा म्हणून ५ सप्टेंबर ‘सर्वपल्ली राधाकृष्णन’ यांचा वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो.
राष्ट्रनिर्मिती चा मूळ पाया घालणारी एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. प्राचीन काळापासून गुरु-शिष्यांच्या नात्यांतील महती ऐकत आलो आहोत. शिष्य कितीही उच्च स्थानी पोहोचला तरी गुरु चरणी नतमस्तक होतो. मूल जन्मले की घरातील प्रथम गुरु आईबाप असतातच. पण आईच्या संस्काराची शिदोरी, सद्वर्तन, सदाचार यापुरतीच मर्यादित असते. तसे गुरूचे नाही. ते अआइई अक्षरापासून मूल व्यवहारी जगात पोहोचण्यापर्यंतचे सर्व ज्ञानशिदोरी शिष्याच्या झोळीत घालतात. अगदी हातचे काहीही न राखता. आपल्याला सर्व शिक्षक आदरणीय असतात. त्यांनी आपल्या आयुष्यात आपण आदर्श बनण्याइतपत ज्ञानाची पूर्ती केलेली असते. त्या ज्ञानामुळे आपणास साफल्य मिळाले असेल. असे गुरु आपल्या नित्य स्मरणात राहतात.
गुरु आणि शिष्याचे नाते खूप आगळेवेगळे असते.त्यामुळे शिक्षकांच्या वेशभूषेपासून ते त्यांच्या लकबी पर्यंत सगळीकडे विद्यार्थ्यांचे बारीक लक्ष असते. काही जण आपल्या शिक्षकांना आदर्श मानून त्यांच्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकांचा जन्मदिन लक्षात ठेवून त्यांना फूल, पेन किंवा गिफ्ट देऊन त्यांच्या प्रती असणारा आदर व्यक्त करतात. कोणत्याही परीक्षेला जाताना गुरूंचे आशीर्वाद घेणे ते भाग्यवान असल्याप्रमाणे मानतात. आदर्श गुरू हे आपल्या आयुष्यभर शिष्याच्या भवितव्या विषयी चिंतन करतो. कोणता विद्यार्थी कोणत्या गोष्टीत किंवा विषयात पारंगत असेल तर पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्याला प्रोत्साहन देतो. वरून फणसाप्रमाणे काटेरी भासणारे शिक्षक मनातून लोण्याच्या गोळ्याप्रमाणे मऊ, हळुवार असतात. आपले विद्यार्थी खूप शिकून जगात नाव कमवावेत हीच भावना त्यापाठीमागे असते. त्यातून मारकुटे शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीविषयी जास्त संवेदनशील असतात. आपले विद्यार्थी उच्च शिक्षण घ्यावेत. कोणी नामवंत बनावेत हीच तळमळ त्यांच्या मनात असते. त्यामुळे वरून रागावले, मारले तरी त्यांनाही वाईट वाटत असते. विद्यार्थ्यांनाही मारकुटे शिक्षक कायम लक्षात राहतात. कारण त्यांच्या शिकवण्याची पद्धत आणि तळमळ याबद्दल त्यांनाही समजते. शिस्तप्रियता आणि वक्तशीरपणा आपण शिक्षकांकडून शिकतो. शाळेत यायला उशीर झाला तर गुरुजींच्या माराची भीती वाटते. परंतु त्यांच्या सोबत शिकायला मिळते. त्यामुळे विद्यार्थी धावतपळत शाळेत येतात. काही शिक्षक मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून शिकवलेल्या अभ्यासक्रमातील प्रश्न व चालू घडामोडी वरील प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करतात. एखाद्या मुलाला न समजलेला भाग पुन्हा पुन्हा शिकवतात. त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करतात. विद्यार्थ्यांची कोरी पाटी सर्व विषयांच्या ज्ञानाने, संस्काराने आणि विद्वत्तेने भरण्याचे काम शिक्षक करतात. बालवयात झालेले संस्कार पुन्हा आयुष्यभर उपयोगी पडते.
जीवन जगताना कितीतरी खडतर प्रसंग येतात. त्यातून तावून सुलाखून निघण्याचे सामर्थ्य बालपणी शिक्षकांनी शिकवलेले संचितच पुरवते,बळ देते. शाळेत घेतल्या गेलेल्या गीताई स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे परीक्षण गुरूच्या हाताखा लूनच केले गेल्याने तो आत्मविश्वास नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाताना किंवा संकटाच्या वेळी येतो. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त विषयांचे ज्ञान देत नाहीत तर जीवन जगण्याचे बाळकडू पाजतात. त्यामुळे त्यांची जीवन नौका कधीही बुडत नाही. कोणत्याही संकटाच्या वेळी विद्यार्थ्यांना गुरूंची आठवण येणार नाही तर नवल! शिक्षक आपल्या ज्ञानाच्या शिदोरी सोबत अनुभवाचे बोलही ऐकवतात. त्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास, राष्ट्राची चौफेर प्रगती, समाजाचा सर्वांगीण अभ्युदय, सुप्त गुणांचा उत्तम विकास आणि भविष्याला आकार देणारी संस्कार संपन्न कर्तव्यनिष्ठ पिढी तयार करण्यासाठी आयुष्यभर ते झटत असतात. शिष्याने जगात काही नाव कमवायचे, गगन भरारी घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर सतत बिंबवत असतात. एखादा होतकरू मुलगा पण परिस्थितीने गरीब असेल तर स्वतःच्या खिशातून सढळ हाताने मदत करायलाही शिक्षक मागेपुढे पाहत नाहीत. राष्ट्रप्रेम, गरिबांविषयी कळवळा, समर्पित सेवाभाव,चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व ,तत्ववादी राजकारण असा हा शिक्षकी पेशा सर्व पेशांहूनी उजवाच म्हणावा लागेल. कारण त्यांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. पूर्वी एखादे शिक्षक समोरून येताना दिसले की मुले मान झुकवत. कारण शिक्षकांच्या नजरेत इतका दरारा होता. एखाद्या सरांनी खेळताना पाहिले तर मुलांची धडगत नसायची. ती मुले लगेच घरात पळत नि अभ्यासाचे पुस्तक उघडून बसत.न जातो गुरूजी घरी येऊन वडिलांकडे तक्रार करतील, नाहीतर उद्या शाळेत शिक्षा करतील. हल्लीची मुले तेवढी भित्री किंवा शिस्तप्रिय राहिली नाहीत. इंग्रजाळलेली ही पिढी मास्तरांच्या डोळ्याला डोळा लावून उडवून उत्तर देताना दिसतात. समोरून सर येताना दिसले की हाय-हॅलो करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. गुरुविषयी मुलांच्या मनात इतकासा आदर उरला नाही. कारण पालकही मुलांसमोर शिक्षकांवर टीकास्त्र सोडतात. एखाद्या शिक्षकाने पाल्याला ओरडले किंवा मारले तर लगेच पालक तक्रार घेऊन मुख्याध्यापकांकडे जातात. मुलाला गोंजारून सांगतात,”थांब आपण त्या सरांची चांगली खोड मोडू” त्यामुळे ती मुले शिक्षकांना तितकासा मान देताना दिसत नाहीत. उलट उत्तर करतात त्यामुळे पूर्वीच्या गुरुशिष्यांची जी आपुलकी होती ती आता राहिली नाही. शिक्षकांनाही अशा मुलांविषयी आत्मीयता वाटत नाही. कारण त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागेल अशी वर्तणूक विद्यार्थी आणि पालकांकडून होत असते.
हल्ली एका कुटुंबात एक किंवा दोन मुले असतात. ती लाडाकोडात वाढली जातात. पालक जातीने मुलांकडे लक्ष देतात. हवे-नको ते लगेच आणून देतात. त्यामुळे मुलांनाही नकाराची सवय नसते. इतर मुलांसमोर शिक्षक ओरडले तरी या मुलांना तो अपमान वाटतो आणि शिक्षकांविषयी आदर वाटत नाही. पिढीनुसार बदल होतात नि त्या नात्यात तफावत येते. परंतु गुरु ज्ञान देण्याचे आपले कर्तव्य जीवापाड निभावून नेतात. कारण त्यांना देशाचे भावी नागरिक घडवायचे असतात. कुंभार जसा ओल्या मातीला हवा तसा आकार देतो. तसे शाळेत आलेल्या चिखलरूपी बालकास मास्तररूपी कुंभार योग्य संस्कार करून त्याला सुंदर आकार देऊन परिपूर्ण बनवितात. हे शिक्षकांना आपले परमकर्तव्य वाटते.

    सौ.भारती दिलीप सावंत
    मुंबई
      फोन 9653445835