• Wed. Jun 7th, 2023

शक्ती फौजदारी कायद्यातील सुधारणांसाठी महिला संघटना, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांना सूचना करण्याचे आवाहन

ByBlog

Jan 8, 2021

मुंबई : राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण या अधिनियमात सुधारणा करण्याकरिता विधेयकातील विषयांमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींकडून (महिला संघटना, स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रातील विधिज्ञ) सुधारणा अथवा सूचना मागविण्यात येणार असून त्यानुसार इच्छूकांनी आपल्या सुधारणा व सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे पाठविण्याचे आवाहन विधानमंडळाचे सचिव श्री. राजेन्द्र भागवत यांनी केले आहे.
सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१- भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ हे, महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता हे विधेयक गृह मंत्री तथा समितीचे प्रमुख श्री. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आले आहे. या विधेयकातील विषयांमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींकडून (महिला संघटना, स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रातील विधिज्ञ) सुधारणा/ सूचना मागविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार ज्या व्यक्ती सुधारणा/ सूचना पाठवू इच्छितात त्यांनी आपल्या सुधारणा/ सूचना तीन प्रतीमध्ये निवेदनाच्या स्वरुपात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे शुक्रवार, दि. १५ जानेवारी, २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत श्री. राजेन्द्र भागवत, सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई- ४०००३२ यांच्याकडे पाठवाव्यात किंवा al.assembly.mls@gmail.com या इमेलवर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकान्वये करण्यात आले आहे. विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रती शासकीय ग्रंथागार, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि व्यवस्थापक, प्रकाशने, शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, नेताजी सुभाष मार्ग, मुंबई – ४०० ००४ यांचेकडे विक्रीसाठी तसेच महाराष्ट्र विधानमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *