• Thu. Sep 28th, 2023

वास्तव आपल्या देशाचे..!

ByGaurav Prakashan

Jan 22, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात अतिशय बिकट अवस्थेतून जात आहे. जणू काही देशाची वाटचाल मृतावस्थेकडे चालली आहे. लोकांच्या वागण्याला धरबंध राहिला नाही. चोऱ्यामाऱ्या, खून, दरोडे यांना ऊत आला आहे. बायालेकींच्या अब्रूची लक्तरे मांडली जात आहेत. या सर्व कारणांमुळे देशात बेबंदशाही वाढण्याचा प्रकार होत आहे. असे मत पंढरपूर दौऱ्यावर आले असता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही चिंता व्यक्त केली. गेल्या सहा महिन्यांपासून आधीच कोरोनाच्या संकटाने सर्व मानव समाज विस्कळीत झाला आहे, ग्रासला आहे. त्यातच विकृती फोफावल्या आहेत. देशावर कोरोनाचे सावट असताना आर्थिक संकट आले आहे. लोकं संसर्गाने आणि मृत्यूच्या भयाने सैरभैर झाली आहेत. सगळीकडे संशयित वातावरण दिसत आहे.
शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नोकरी, व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना दोन वेळच्या पोटाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्यातच नोकरी गमावून बसल्यामुळे बऱ्याच तरुणांपुढे उद्याचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सगळीकडे अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. माणुसकीशून्य वातावरणात बुद्धीही काम करेनाशी झाली आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या तरुण पोरी आपली खाजगी संपत्ती असल्यासारखेच हा भरकटलेला तरुण समजू लागला आहे. ‘रिकामे मन सैतानाचे घर’ या उक्तीप्रमाणे हाताला काम नाही आणि डोक्यात विचारांचे किडे वळवळत असताना वासनांध चाळे करण्यासाठी गावातील तरुणींना छेडले जात आहे. नकार पचवायची सवय नसलेला हा युवावर्ग त्या तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारायलाही कमी करत नाही. हे सर्व हाथरसच्या उदाहरणावरून दिसून येते.
दलित वस्तीतील मनिषा वाल्मिक अशा निर्ढावलेल्या तरुणांच्या सापळ्यात अडकली आणि सामूहिक अत्याचार होऊन आपला जीव गमावून बसली. गरिबाला कोण वाली असणार! त्यामुळे बड्या धेंडांची ही मुले निर्दोष सुटली. कायद्याचे रक्षक आणि त्यांचे पाठीराखे यांनी जास्त काही चौकशी न करता तिच्या आईवडीलांना थांगपत्ताही लागू देता मृतसंस्कारही पार पाडले. सर्व पुरावा नष्ट केला. आता तिचे गरीब आई-वडील दारिद्र्याने पिचून गेलेले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल हे सांगताना ही शिक्षा ऐकून गुन्हेगार माता-भगिनी कडे वाईट नजरेने पाहण्याचा विचारही करू शकणार नाहीत असा आशावाद व्यक्त केला आहे. देशभरात अत्याचाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात असताना आणि पीडितेला न्याय मिळावा म्हणून सरकारवर दडपण आणले असतानाही काही लोक जात पंचायतीच्या नावाखाली या घटनेतील आरोपींना जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचा कांगावा करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ सरसावले आहेत .
स्त्री ही जननी असून तिचा आदर केला जावा हीच मानवतेची चतु:सूत्री असताना हाथरस येथील घटनेचा निषेध करणेच योग्य आहे. एक तरुणी सामूहिक अत्याचाराची बळी ठरते, प्रशासन तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याऐवजी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतेय ही कसली मानसिकता! शिवाजीराजांच्या काळात स्त्रियांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यालाही कडक शिक्षा केली जात असे. आता तरी आधुनिक युग चालू आहे. मनुष्य साक्षर, उच्चविद्याविभूषित झाला आहे. विचारांनी प्रगल्भ झाला आहे. या काळात अशा घोर अपराध्यांना दंडित करण्याऐवजी शासन पाठीशी घालत असेल तर साक्षर असण्याचा काय फायदा !त्या पीडितेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी! तेव्हा त्या तरुणीच्या आत्म्याला शांती मिळेल आणि पुढेही अजून कोणी मुलींच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही.
प्रत्येकाच्या घरात आई, मावशी, आजी, आत्या, बहीण, वहिनी अशी नाती असताना देखील परस्त्रीकडे वक्रदृष्टी ठेवण्याची माणसाची ही नियत म्हणजे माणुसकीला अक्षरश: कलंक आहे.आपण जी अत्याचाराची कृती करतो ही आपल्या बहिणी, आईवर कोणी केली तर त्या तरुणाला ते सहन होईल का? मग अत्याचारी व्यक्तीदेखील कोणाचीतरी मुलगी, बहीण असू शकते ही वृत्ती का असू नये? आज आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत विकसित होत होऊ पाहात आहे. अशा वेळेला अशा विकृतींनी आपल्या देशाला आणि माणूसकीला कलंक लावण्याचे कृत्य करणे कितपत योग्य आहे! याचा विचार करण्याएवढी कुवत मनुष्यामध्ये आहे. आज एकविसाव्या शतकाचे आपण नागरिक आहोत आणि ‘फूल ना फूलाची पाकळी’ या ध्येयाने प्रेरित होऊन आपणही देशाच्या विकासाला काही हातभार लावावा ही वृत्ती प्रत्येक युवकाने ठेवणे आज आवश्यक आहे. जर समाजातील प्रत्येक युवक सुधारणा मतवादी होऊन पुढे सरसावला तर अधम कृत्य न होता सत्कृत्य होण्याचाच मार्ग दिसेल. आपली भारतीय संस्कृती आदर्श संस्कृती म्हणून जगभरात प्रसिद्ध असताना नीच कृत्यांनी देशाच्या नावाला काळिमा फासला जात आहे.
याउलट सर्व तरुणांनी आज स्वयंप्रेरणेने स्वावलंबी आणि व्यवसाय उद्योगात प्रगती करून देशाला पुढे नेण्याचे कार्य केले तर सर्वांचेच हित आहे.
आज सर्वत्र चंगळवाद वाढला आहे. एसीच्या खोलीत फोमच्या खुर्चीवर बसून पाच आकडी पगार घेण्याची अपेक्षा प्रत्येकाच्या मनात असते. त्यासाठी मेहनत लागते हे कोणाच्याही निदर्शनास येत नाही किंवा तिकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे हिंसाचार, खून ,मारामाऱ्या अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.आपले राहणीमान पाश्चात्य देशांप्रमाणे व्हावे असे वाटत असले तरी सुद्धा त्यांच्या इतकी मेहनत करण्याची आपली तयारी नसते. आपल्याला ‘झट मंगनी पट ब्याह’ असा खिशात खुळखुळणारा थोड्या वेळात भरपूर मिळणारा फक्त पैसा हवा असतो. त्याचेच रूपांतर मग गुन्ह्यांमध्ये होते. जेव्हा शिक्षणाचे, करिअरचे वय असते त्यात ही तरुण पिढी नको ते व्यसन आणि वाईट धंदे करत वाहवत जाते आणि वेळ निघून गेल्यावर मग अपराधीपणाला जन्माला घालते. यासाठी शाळेपासूनच संस्कार वर्ग आणि स्वयंपूर्ण बनण्यासाठी छोटे-मोठे हस्तोद्योग, कुटीरोद्योग या उद्योगधंद्यांविषयी माहिती देणारे प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणीदेखील वाढत आहे. त्यामुळे युवकांच्या हाताला ही काम मिळेल आणि मनातील विकृतींना बाजूला सारून युवक व्यवसायातून पैसा कमवू शकेल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    देश आमचा महान भारत
    होईल युवक आत्मनिर्भर
    समजून घेत मोल जीवनाचे
    चढेल यशोशिखरेही झरझर
    सौ.भारती सावंत
    मुंबई
    9653445835