• Mon. Sep 25th, 2023

लवकरच उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

ByGaurav Prakashan

Jan 28, 2021

मुंबई : रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हरि ओम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर, त्यांच्या पराक्रमांवर अनेक चित्रपटांमधून भाष्य करण्यात आलं आहे. याच चित्रपटांच्या यादीत आता हरी ओम या चित्रपटाचा समावेश करण्यात येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून हा चित्रपट अँक्शनपॅक्ड असल्याचं म्हटलं जात आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन तरुण पाठमोरे उभे आहेत. यात त्यांच्या खांद्यावर जय जगदंब आणि जय दुर्गे असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्याचसोबत दोन्ही तरुणांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि एक किल्ला दिसत आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये होती. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. आमच्यासाठी देखील शिवाजी महाराज आमचे दैवतच आहे. त्यामुळे आम्ही आमची पहिली कलाकृती त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरू करत आहोत. आज आमच्या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होत असून, आम्ही ते पोस्टर महाराजांना सर्मपित करीत आहोत. आम्ही आमच्या सिनेमातून महाराजांची तत्त्वे नक्कीच लोकांपयर्ंत पोहचवण्याचा प्रयत्न करू, असे चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले. दरम्यान, आशिष नेवाळकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती हरिओम घाडगे यांनी केली असून हा कौटुंबिक चित्रपट आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाच्या कथेविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!