• Tue. Sep 26th, 2023

रोजगार निर्मिती करणारे व्हा – गडकरी

ByGaurav Prakashan

Jan 21, 2021

नागपूर : कोविड-१९ च्या काळातून अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे. कचर्‍याचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक रोजगार निर्मिती कशी करता येईल, यासाठी प्रयत्न केले जावे, अशी अपेक्षा केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
ऑल इंडिया असो.ऑफ इंडस्ट्रीजच्या सदस्यांशी गडकरी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. यावेळी अध्यक्ष विजय कलंत्री, संगीता जैन व अन्य उपस्थित होते. कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्रांना समस्यांचा सामना करावा लागला. कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम झाला. या दरम्यान, उद्योगांसमोरही अनेक आव्हाने उभी होती. मागणी कमी झाली होती. खेळते भांडवल नव्हते. बांधकाम क्षेत्रात स्टील महाग झाले. त्याचा परिणाम बांधकामावर झाला. परंतु या सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी आता उत्पादन खचार्पासून अन्य सर्व खर्चात बचत करणे गरजेचे आहे. वस्तूचा उत्तम दर्जा ठेवणे, वेळेत मालाचा पुरवठा, चांगले डिझाईन, याशिवाय आपल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार नाही. तसेच आयातीला पर्याय निर्माण करून निर्यातीला अधिक प्रोत्साहन देणे हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आयातीला पर्याय निर्माण होऊ शकतो, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- डिझेलला पर्याय म्हणून जैविक इंधन निर्मिती होऊ शकते. इथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, सीएनजीचा वापर यशस्वी ठरला आहे आणि परवडणारा असल्याचे सिध्द झाले आहे. याशिवाय इले. बस, कार, स्कूटरही विजेवर चालत आहेत. फार्मास्युटिकल क्षेत्रात अनेक उद्योग चांगला व्यवसाय करीत आहेत. पण वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात मात्र विकास करण्यास भरपूर वाव आहे, याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!