• Sun. Jun 4th, 2023

राज्य सरकार पोलिसांसाठी घरे उपलब्ध करून देणार

ByBlog

Jan 1, 2021

मुंबई : पोलिसांच्या वास्तव्यासाठी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलिस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पयार्यांचा अवलंब करून, जास्तीत जास्त संख्येने आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
या बैठकीत पोलिसांना निवासस्थान बांधून देणार्‍या खासगी विकासकांना सवलत देणे, पुनर्विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पातील रहिवासी क्षेत्राच्या आरक्षणात सवलत देऊन निवासस्थानाची उपलब्ध करून घेणे, राज्यातील गृह विभागाच्या जागांचा पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून विकास करणे आणि त्यासाठी महामंडळाला बीज भांडवल उपलब्ध करून देणे अशा विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. म्हाडाच्या भुखंडावरील निवासस्थान इमारतींचा पुनर्विकास याबाबतही चर्चा झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात पोलिसांसाठी जितकी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातुलनेत स्वातंत्र्यानंतरही तितकी निवासस्थाने उपलब्ध करून देता आली नाहीत. त्यामुळे पोलिस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केली आहे.
आदित्य ठाकरेंचे ट्विट
वरळी पोलिस वसाहतीच्या संदर्भात पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन बिहारी जी आणि प्रज्ञा जी यांच्या कार्यालयात भेट देऊन चर्चा केली. पहिल्या टप्प्यामध्ये पुढील ३ वर्षांत वरळी येथे सुमारे १000 घरे पोलिस बांधव-भगिनींसाठी निर्माण करण्याच्या आराखड्यावर चर्चा केली, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या घरांचा मार्ग लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *