• Mon. Sep 25th, 2023

यशाची गुरुकिल्ली

ByGaurav Prakashan

Jan 23, 2021

आत्मविश्‍वास म्हणजेच स्वत:वरचा विश्‍वास. हा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. आत्मविश्‍वास ही यशाची गुरुकिल्ली असते. आपल्यासाठी व इतरांसाठी एखादे चांगले काम केल्यावर त्यातून जी ऊर्जा निर्माण होते, ती तुमच्यातल्या आत्मविश्‍वासाची असते. हाच आत्मविश्‍वास आपल्याला जीवनातल्या कठिणातल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ देत असतो.
लहान लहान कामांतदेखील मुले अगदी आनंद शोधतात. मजा करतात. हीच मजा नकळत त्यांना स्वावलंबनाचे धडे गिरवून देत असते. त्यांचा आत्मविश्‍वास वाढवत असते. असा आत्मविश्‍वास वाढविण्याचे काम पालकांनी जाणीवपूर्वक केले पाहिजे. काही पालक ते करीतही असतात. छोट्या-छोट्या कामांमधून मुलांचे मनोरंजन तर होतेच, शिवाय त्यांच्यातला आत्मविश्‍वास वाढतो. नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. मुलांचे आयुष्य मोबाइलने इतके वशीभूत झाले आहे की अभ्यासाचे काही शोधायचे असेल तर मोबाइल, मनोरंजन पाहिजे तर मोबाइल, विरंगुळा पाहिजे तर मोबाइल! मोबाइलच्या या आभासी पिंजर्‍यात आपली मुले इतकी अडकली आहेत की स्वत:ची भाषाच विसरून गेली आहेत. मुलांचे निसर्गाशी नाते तुटलेले आहे. आप्तमित्राशी असलेले कनेक्शन कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्‍वास कमी झाला. प्रत्येकच मूल जन्माला येतानाच आत्मविश्‍वासाचा खजिना घेऊन येत असते. पण भवतालचे जग, माणसे त्यांच्यातल्या या विश्‍वासाला ओहोटी लावत असतात. या मुलांमध्ये परत विश्‍वास भरायचा असेल, त्यांच्यातील ही शक्ती जागी करायची असेल तर त्यांनी केलेल्या चुकांमधून शिकण्याची संधी त्यांना द्यावी लागते. शक्य तेव्हा त्याचे अनुभव त्याला स्वत:ला घेऊ द्यावे लागतात. हे अनुभव मग त्याला अशी फरशी पुसणे, कचरा पेटीत टाकणे, चहाचे कप उचलून नेणे, एखादी वस्तू दुकानात आणायला सांगणे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळतात. आपण स्वत: काहीतरी चांगले काम केल्याचा आनंद, आत्मविश्‍वास या मुलांच्या चेहर्‍यावर झळकतो. पालकांकडून कौतुकाची थाप मिळाली तर उत्साहदेखील वाढतो. हे जीवन शिक्षण आपल्याला पुस्तकांमधून मिळत नाही. त्यासाठी आपल्याला आयुष्याचेच धडे वाचावे लागतात. मनाविरुद्ध काही झाले की आकांडतांडव करणारी मुले आपण पाहतो. पण प्रत्येकच गोष्ट मनासारखी होत नसते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!