• Thu. Sep 28th, 2023

मुग्धकिशोरी

ByGaurav Prakashan

Jan 21, 2021
  कधी कधी ती हळवी होते बालमनाला आठवते
  मुग्धकिशोरी अबोल राणी क्षणाक्षणाला गहिवरते
  गुणगुणतांना सुरेल गाणी भाव मनाचे ती जपते
  हिरवळ सुंदर बागेमधली तिच्या स्वरांनी मोहरते
  खळखळणारा झरा कसा हा शांत किनारी लपला गं
  भरभर येता अवखळ वारा ओल पापणी आली गं
  कसे कळेना मन बावरले सहज हरवले कशात गं
  हुरहुर तिजला क्षण एकांती दर्पणात मन रमले गं
  सनई चाहुल कानी येता छुमछुम पैंजण हसले गं
  भाव मनाचे प्रीत सागरी गहिवरलेले क्षणात गं
  कसे कळेना तिच्यात रमले क्षण प्रीतीचे अबोल गं
  गमंतजमंत मैतरणींची झिम्मा फुगडी मनात गं
  बदले सृष्टी तिच्या मनाची नवीन पहाट हसली गं
  तिला कळाले सुर मनाचे प्रीत सागरी जुळले गं
  क्षणाक्षणाला हसते बहरत अवतीभवती कुजबुज गं
  प्रिया पाहता स्वप्नामधला खळी गालात दिसली गं
  प्रज्ञा बागुल
  कसारा ठाणे