भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये एका ३४ वर्षीय व्यक्तीने मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर बलात्कार केल्यानंतर १४ वर्षीय मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्नही आरोपीने केला.
मध्य प्रदेशच्या बेतूल जिल्ह्यात ही घटना घडली. सोमवारी रात्री उशीरा पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत मोठ्या दगडांच्या ढिगार्याखाली दबलेल्या अवस्थेत सापडली. तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथून तिला पुढे नागपूरच्या रुग्णालयात हलवले आहे. बेतूलचे पोलिस अधीक्षक सिमला प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी आरोपी सुशील वर्माला अटक केली असून तो पीडितेच्याच गावातला रहिवासी आहे. त्याच्याविरोधात भादंवी कलम ३७६ , कलम ३0७ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील वर्मा हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता आणि त्याचे मुलीच्या घरी नेहमी येणेजाणे असायचे. पीडित मुलगी त्याला काका बोलायची अशी माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शेतातला पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेली होती. बाजूच्याच शेतात काम करणार्या सुशीलने तिला खेचून नेले आणि बलात्कार केला. आरोपीने मुलीला मारहाण केली आणि तिच्या डोक्यातही दगड घातला. नंतर आरोपीने मुलीला दगडाच्या ढिगार्याखाली जिवंत पुरून मारुन टाकण्याचा प्रयत्न केला अशी माहिती प्रसाद यांनी दिली.
मित्राच्या मुलीवरच केला बलात्कार
Contents hide