• Tue. Sep 19th, 2023

मानवा सारखा व्यवहार कर…

ByGaurav Prakashan

Jan 28, 2021
  मानवा तुला मानवाचा,
  देह दिला या निसर्गाने.
  सर्व प्राण्यांहून श्रेष्ठ असे
  स्थान दिले तुला या निसर्गाने
  निसर्गाने दिली बुद्धी तुजला
  सुविचार तो करण्यासी
  चांगले-वाईट काम आहे
  सारे हे जाणून घेण्यासी
  या बुद्धीचा वापर करुनी
  चांगल्याचा तू स्वीकार कर…
  “आहोत आम्ही मानव सारे,
  मानवा सारखा व्यवहार कर”…
  निंदा, वैर, द्वेष, इर्षा,
  यातच तू गुंतून राहतो
  मानवाच्या या धर्माला
  कलंक तू का लावतो.
  सुंदर करायचे असेल जीवनाला,
  तर प्रेमाचा स्वीकार कर.
  प्रेमाने राहून तू सर्वांशी
  या जीवनाचे कल्याण कर
  सत्य बोध हा घेऊन आता
  या जीवनाचा ‘उद्धार’ कर
  “आहोत आम्ही मानव सारे
  मानवा सारखा व्यवहार कर”…
  ऐकलंत का कधी प्राण्यांना,
  म्हणावं लागलं प्राणी बन.
  विचार याचा कर जरासा,
  शांत ठेवुन आपले मन.
  का म्हणावे लागते तुजला
  अरे माणसा ‘माणूस’ बन…
  आत्ता तरी दानवता त्यागून,
  माणसा तू ‘माणूस’ बन.
  मानवतेचा पाईक होऊन,
  मानवतेचा प्रचार कर.
  “आहोत आम्ही मानव सारे,
  मानवा सारखा व्यवहार कर”…
  – सिद्धार्थ कांबळे
  ई सेंट्रल