मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, असे आवाहन करत केंद्र सरकारला साद घालण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडावी आणि आरक्षण अबाधित राहण्यासोबतच एसईबीसी अरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, यासाठी केंद्राने भूमिका घ्यावी. देशभरातील राज्यांना जे आरक्षण दिले आहे ते अडचणीत येणार नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर येत्या २५ जानेवारी २0२१ पासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी होणार आहे. पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच खासदार बाळू धानोरकर या नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळाने शरद पवारांशी सुमारे पाऊण तास चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय भाजप नेते आशिष शेलार यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केल्याचे समजते.
यावेळी मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. यासंदर्भात त्यांनी शरद पवारांशी झालेल्या बैठकीत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले. कायदेशीरबाबींवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. शरद पवारांनी यासाठी होकार दिल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत संवेदनशील आहेत. आता मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही लक्ष घालावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार आहे, असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी यापूर्वी दिली होती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!