अमरावती : अमरावती मध्यवर्ती कारागृहातील तीन मयत शिक्षाबंदींच्या मृत्यूबाबत दंडाधिकारी चौकशी करण्यात येत असून, त्याबाबत माहितगारांनी माहिती सादर करण्याचे आवाहन चौकशी अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उदयसिंह राजपूत यांनी केले आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंदी लक्ष्मण रामा बदामे (वय 45, रा. सुभाषनगर, रेबेलो कम्पाऊंड, गल्ली क्र. 18, टेकडी क्र. 2, महाकाली, अंधेरी (पू.), मुंबई यांचा 13 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेबाबत यथोचित माहिती असणा-यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती आवश्यक कागदपत्रांसह 20 जानेवारी 2021 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय (तहसील कार्यालय परिसर, श्याम चौक, अमरावती) येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न्यायबंदी भूमा गोमा चतुरकर (वय 48, रा. मानी, ता. आठनेर, जि. बैतुल) यांचा 17 जून 2020 रोजी रात्री 21.45 वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेबाबत माहिती असणा-यांनी आवश्यक कागदपत्रांसह 20 जानेवारी 2021 पर्यंत माहिती समक्ष सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, शिक्षा बंदी टिकेश उर्फ रिकेश उर्फ टिंक्या लांजेवार (वय 28, रा. कल्याणनगर, गल्ली क्र. 1, अमरावती) यांचा 21 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5.50 वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती असणा-यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती 15 जानेवारीपूर्वी समक्ष सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
या चौकशीदरम्यान कैदी मयत होण्याचे कारण, कैद्याची मृत्यूपूर्व स्वास्थ्य स्थिती, मारामारी होऊन मृत्यू झाला किंवा कसे, पोलीसांनी कोणती भूमिका बजावली, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल आदी बाबी तपासण्यात येणार आहेत.
मयत शिक्षाबंदींच्या मृत्यूबाबत दंडाधिका-यांकडून चौकशी माहितगारांना माहिती देण्याचे आवाहन
Contents hide