भुत निर्माण होत असतील काय?

भुत कसे निर्माण होतात? ते खरंच निर्माण होतात की नाही? ते दिसतात का? दिसतात तर केव्हा? कसे दिसतात? अन् नेमके ते त्याचवेळी का दिसतात? वैगेरे प्रश्न प्रत्येकाला पडत असतात.याची उत्तरं आपल्याला न सापडत असल्यानं आपण घाबरत असतो आणि आपली ही भीती घालविण्यासाठी आपण तांत्रीक मांत्रीकांच्या आहारी जात असतो.ज्या तांत्रीक,मांत्रीकाजवळ एवढासाही मंत्र नसतो.ते आपल्याला भुलथापा देवून आपल्याकडून पैसे लुटत असतात.समजा खरा भुत अशा मांत्रीकासमोर आलाच तर अशी मंडळी त्याला पाहून पळ तर नक्कीच काढतील असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.तर आपण भुताचं अस्तित्व पाहूया.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    १) खरंच भुत असतात का?

याबाबत विचार मांडतांना मी सांगेन की अशी भुतं नसतातच मुळात.परंतू त्या भुताचं अस्तित्व आपल्या मानसिकतेनुसार असतं.आपली मानसिकता जर भुत आहे अशी मानत असेल,तर भुत नक्कीच असतो आणि नाही मानत असेल,तर भुत नक्कीच नसतो.ज्याप्रमाणे आपण देव प्रत्यक्ष पाहिला नसतांनाही देव आहे असं मानून निव्वळ एखाद्या धोंड्याला देवाची उपाधी देवून देव मानतो.तसेच भुताचेही आहे.आपल्या मनात जी भीती जन्म घेते.ती भीती म्हणजेच भुत.ही भीती घालविण्यासाठी अशा देवाची आपण पुजा अर्चना करतो.कारण आपल्याला वाटते की असं भुताचं किंवा कोणत्या गोष्टीचं संकट आलंच तर आपल्याला वाचता येईल.मग त्या धोंड्यातील देवाची पुजा करताच आपल्याच शरीरातील आत्मीक बळ जागं होतं.तेच बळ काम करीत असतं व कार्य घडतं.ते कार्य संपन्न होताच ते कार्य देवानं केलं असं आपण म्हणतो.ज्याप्रमाणे आपली मानसिकता देव आहे असं सांगते.त्याचप्रमाणे आपली मानसिकता भुत आहे असंही सांगते.देव आणि भुत या एकमेकांच्या विरुद्ध बाजू असून त्या सर्व गोष्टी आपल्या मानण्यावर आहे.उदा.आपण जर एखाद्या वेळी एखाद्या सापाला पाहिल्यावर विचार केला की साप तिथेच आहे.तर तो गेल्यावरही आपल्याला तसा दिसणारच.कारण भीती.तो साप गेलेलाही असेल तरीही.तेच भुताच्या बाबतीतही घडतं.

    २) भुत हे कसे दिसतात केव्हा दिसतात?

भुत हे साधारणतः पांढरे कपडे घालतात.तसेच काहींना पाय असतात,पण ते उलटे असतात.काहींना पाय नसतात असं म्हटलं जातं.काहींना डोकंच नसतं.भुतं तसं पाहिल्यास वेगवेगळ्या प्रकारची असतात.पण त्या त्या भागानुसार त्या त्या भुतांना वेगवेगळी नावं आहेत.ती काम बहुतेक सारखी करीत असली तरी…
भुतं ही मुख्यतः रात्रीच दिसत असतात असंही काही लोकं म्हणतात.तसेच काही लोकं दिवसाही दिसतात असं मानतात.त्यांच्या दिसण्याची वेळ ही बारा ते तीन असून ज्याठिकाणी वर्दळ असते.त्या ठिकाणी ते निवास करतात असेही लोकं मानतात.मुख्यतः ज्या घरात कोणी राहात नाही अशा घरात ते निवास करीत असून त्या ठिकाणी त्यांना कायम स्वरुपी राहता यावं म्हणून ते त्या ठिकाणी राहायला जाणा-याला त्रास देत असतात असंही भुताबद्दल सांगीतलं जातं.

    ३) भुतं डोळ्यांना दिसतात का?

भुतं हे काही लोकांना डोळ्यानं दिसतात.असंही मानलं जातं.तर काही लोकं ते प्रत्यक्ष डोळ्यानं दिसत नसून ते अदृश्य रुपात आपल्या अवतीभवती फिरत असतात असेही मानत असतात. काही म्हणतात की त्यांचा भाष झाला.तर लहानपणी मी एका व्यक्तीकडून ऐकले होते की त्याने भुतांशी कुस्तीही खेळली.परंतू या सर्व कल्पना असून भुतं अस्तित्वात नसून ते कुणालाही कधीही दिसत नाहीत.

    ४) भुतं निर्माण होतात का?

काही लोकं मानतात की भुत हे सतत निर्माण होत असतात.ज्यांची आत्मा त्याच्या जीवंतपणी तृप्त होत नाही.कुणाचा अकाली अपघात होतो.तर कुणी असंतुष्टानं आत्महत्या करतो.अशांच्या आत्मा ह्या भुतं म्हणून पृथ्वीवर सतत फिरत असतात.असंही काही लोकं मानतात.तर काही लोकं वाईट कृत्य करुन धन कमवतात.त्यांना वाटते की मला ते धन आयुष्यभर पुरावं.परंतू अशांना जेव्हा अकाली मरण येतं.तेव्हा अशांनी स्वार्थापोटी वाईट कृत्यानं कमविलेलं धन हे त्यालाच खायला न मिळाल्यानं अशी आत्मे भुत बनून त्या धनाभोवती फिरत असतात.त्यांना वाटत असते की हे धन मला उपयोगाचं झालं नाही.परंतू ते माझ्या मरणानंतर तरी कोणाच्या कामात यावं.परंतू जेव्हा तसं होत नाही.तेव्हा मात्र ही मंडळी भुत बनून त्या धनाचं रक्षण करीत असतात.पण असं जरी असलं तरी आपण आज कित्येक प्राणीमात्रांचे बळी घेत असतो.त्यांचा वापर खाण्यासाठी करीत असतो.जर आपल्या माणसांची आत्मे भुत बनून जेव्हा छळायला लागते असे जेव्हा आपण मानतो.तेव्हा आपण हेही मानायला पाहिजे की अशा प्राणीमात्रांच्या दुखावलेल्या आत्म्याने आपल्याला छळायला हवं.पण तसं होत नाही.

    ५) भुतांचं वशीकरण होतं का?

भुताचं वशीकरण कोणत्याच मंत्रानं होत नाही.ते निव्वळ थोतांड गोष्ट आहे.कारण जिथे भुतंच नाहीत.तिथं वशीकरण येणार कुठून?तेव्हा अशा गोष्टी कोणीही मानण्याची गरज नाही.

    ६) भुताचे काही प्रकार असतात का?

भुताचे अनेक सारे प्रकार असले तरी मुख्यतः दोन प्रकार पडतात असे काही लोकं मानतात.अ)त्रास देणारा भुत. आ) मदत करणारा भुत.जिंदसारखे काही भुत हे मदत करणारे भुत आहेत.पण महत्वाचं म्हणजे जिथं भुतंच अस्तित्वात नाहीत.तिथे जिंद हा भुताचा प्रकार आला कुठून? तरीही आपण भुत मानत असतो.
महत्वाची गोष्ट अशी की लोकांच्या मानसिकतेनुसार भुताबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना लोकांनी मांडलेल्या असून त्यावर लेखनही केलेले आहे.तसेच बरेचसे लेख सोशल मिडीयावरही आहेत.मुळतः भुत जरी नसले तरी जो त्याचं अस्तित्व मानतो.त्याच्या मानगुटीवर असा भुत बसल्याशिवाय राहात नाही.म्हणून कोणीही भुत मानू नये नव्हे तर त्याची कल्पनाही कोणी करु नये.हे तेवढंच खरं आहे.

    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०