• Mon. Sep 18th, 2023

बौद्ध समाज जाणीव आणि जबाबदारी

ByGaurav Prakashan

Jan 18, 2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने अतिशय परिश्रमपूर्वक, अगदी जीवाचं रान करुन आपल्या समाजबांधवांना बुध्द धम्माच्या निर्मळ प्रवाहात आणून त्यांना अगदी स्वच्छपणे जगासमोर त्यांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचा फार मोठा प्रयोग केला आणि तो म्हणजे बुध्द धम्माचा स्वीकार…! हा प्रयोग म्हणजेच फार मोठी धम्मक्रांती म्हणून जगात ओळखली जाते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती केली, हे सर्वश्रुतच आहे. हिच क्रांती पुढे चळवळ म्हणून राबविण्याची आणि भारत बौध्दमय करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांवर सोपविली. ही जबाबदारी आव्हानात्मक स्वीकारण्याची तयारी आणि खबरदारी अनेक अनुयायांनी घेतली. त्यासाठी बुध्द धम्माचा प्रसार-प्रचार करण्यासाठी गावागावातून ज्यांच्याकडे सदर कार्य करण्यासाठी जी जी क्षमता आहे, जे जे कौशल्य आहे त्या परीने सांस्कृतीक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आणि वैयक्तीकदृष्ट्या ज्यांचा परिणामकारक प्रभाव ज्या ज्या प्रमाणे पडू शकतो, त्या प्रकारे ही मंडळी गाव-खेडे शहरात ही कार्यप्रणाली आपआपल्या पध्दतीने राबवू लागलीत. सामाजिकदृष्ट्या ज्या घरांमध्ये आधीच्या काळापासून थोडी फार श्रीमंती होती, इतरांपेक्षा आर्थिक स्थितीही बऱ्यापैकी होती, अशा समाज बांधवाचा त्या त्या गावात समाजावर आधीचा न कळत म्हणा की जाणिवपूर्वक एक दबदबा होता. या लोकांच्या बोलण्यातून त्यांच्यातला आर्थिक सुबत्तेच्या अंगाने इतर समाज बांधवावर त्यांचा प्रभाव पडत होता. समाजातील अनेकांनी या बऱ्यापैकी सबळ (आर्थिक) माणसाच्या मागे जावून बुध्द धम्माच्या बाबतीत किंवा समाजहिताच्या ज्या काही बैठका व्हायच्या त्यात त्यांनी भाग घ्यायचा. मात्र आपली सदर माणसाच्या विचाराचं खंडण करण्याची कुवत असली तरी आपण तेवढे आर्थिकदृष्ट्या
सबळ नसल्याने कुठलाही विरोध अथवा वाद न करता समाजकारण त्यांच्या घरातून स्वीकारण्याचा अबोल राहुन पायंडा पाडून घेतला. ज्या काही धम्मसंहिता आहेत, जे काही बुध्द धम्माच्या दृष्टीने योग्य आहे अथवा योग्य नाही तरी कुठलाही अटकाव न करता समाज अशा व्यक्तीच्या कार्यालाच प्रमाण मानत गेला. मात्र सदर घरांबद्दलची कुठलीही शहानिशा तर्कशुध्दता न तपासता अनेक वेळा समाजही निशंकपणे अशा व्यक्तीच्या नको असतांनाही मागे गेला. त्यामुळे बुध्दाच्या धम्माचं खरं ज्ञान लोकापर्यंत पोहचलं नाही. दुसरी परिस्थिती अशी की जो धम्मबंधु हुशार अथवा तो धम्म समजण्याची, समजून घेण्याची त्याची क्षमता असूनही समाजाने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. अनेकजण तर धम्माच्या प्रचार प्रसाराच्या फंदातच पडायचं नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं, अशा भ्रमात समाजात आजही वावरत आहेत. समाज जाणिवा त्यांच्यात निर्माणच झाल्या नाहीत.
सांस्कृतिकदृष्ट्या ज्यांना ह्या जाणिवा थोड्याफार कळाल्यात आणि त्यांनी जो जम बसविला त्या चौकटीबाहेर त्याने स्वतःला कधीही जाऊ दिलं नाही. अथवा आपल्या सांस्कृतिक योगदानाच्या कार्यात कुणाचा शिरकाव खपवून घेतला नाही. म्हणजेच सांस्कृतिक क्षेत्रात प्रचारप्रसार करणाऱ्यांनी इतरांना तुच्छ अथवा आपल्यापेक्षा कमी प्रतिचा म्हणून लेखायला सुरु केलं, त्यामुळे नाऊमेद होऊन त्यांच्या केवळ जाण्यासाठी प्रयत्न करणारा बांधव त्यांच्यापासून दूरच राहण्यात आपली भलाई मानू लागला. या प्रवृत्तीमुळे जवळ येणारा माणूस दूर गेला किब किंबहुना तो समाजात फटकून वेगळा राहू लागला.- अशाप्रकारच्या नेतृत्वांचा उदय प्रत्येक गावा-शहरात झाला.
नेमकी खरी भूमिका, चळवळीची स्पष्टता कळू शकली नाही. गर्दी म्हणजे चळवळ नाही. गर्दी जमविणे म्हणजे खरं नेतृत्व नाही. आपल्या मागे पाच-पन्नास असतात म्हणजे ते आपल्या सर्वच भूमिकाचा
स्वीकार करतात असं नाही. नेमकं नेतृत्वच योग्य न मिळाल्यामुळे त्या त्या गाव-शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीची दिशा योग्य साधू शकली नाही. या नेतृत्वाच्या हेवे-दाव्याच्या लढाईत समाजमने संभ्रमीत झाली आणि समाजाची चांगल्या माणसांवरची सुध्दा समाजनिष्ठा, विश्वासार्हता डळमळीत राहीली. त्यामुळे अनेकाअधिक मते मतांतरे, अनेक तर्कशुध्द बुध्दी, अनेक अर्थाने माणसांत, समाजात द्वेषभाव, दोषारोप होत जाऊन समाज एक विचाराने राजकीय, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या एकत्रीत येऊ शकला नाही. जयंती, महापरिनिर्वाण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि काही सामाजिक अन्य कार्यक्रमाकरिता जरी आम्ही एकत्र दिसत असलो तरी मनाने एकत्र आलेलो नसतो, ही खरी शोकांतिका आहे. त्यामुळे आम्हाला आमचे ‘अस्तित्व’ किंवा आमच्या स्वतःची जाणिव होऊ शकली नाही. ज्यामुळे आम्हाला धम्म संपूर्णतः कळलाच नाही. एकमेकांशी मैत्रीपूर्ण संवाद होत नसेल तर आम्हाला खरोखरच धम्म कळला नाहीच म्हणावे लागेल.आमचा आमच्यातील अंतर्विरोध आमच्याच धम्म -हासासाठी कारणीभूत आहे. ही जाणिव जोपर्यंत प्रत्येकामध्ये होत नाही तोपर्यंत आमच्यात एकत्रीत लढण्याची भावना निर्माण होणार नाही. आपल्या हितशत्रूचा मुकाबला आपण करु शकणार नाही. – आम्ही बौध्द आहोत म्हणजे आम्ही नेमकं काय आहोत? आमच्या बौध्द होण्यामागची जी पार्श्वभूमी आहे, जो इतिहास आहे, तो नेमका आठवला आणि खऱ्या अर्थाने त्याचे चिंतन केले की आपल्या लक्षात येईल की ही जी सुखी संपन्नता, ही जी वैचारीक, अभिव्यक्तीची समृध्दता आमच्या जीवनात आली ती बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे, बाबासाहेबांच्या वैचारिक क्रांतीमुळे, बाबासाहेबांच्या योग्य दिशा निर्देशामुळेच…! ही समृध्दता, ही मिळालेली संधी आम्ही व्यर्थ गमावता.. कामा नये. . आता नेमकं बौध्द असणं म्हणजे काय? आपण बौध्द असल्याची जाणिव आपल्यात निर्माण झाली पाहिजे. इथे ‘गर्व से कहो.’. अशासारखा गर्व नको मात्र जाणिव महत्वाची आहे. बौध्द असणं म्हणजे आपण तथागत सम्यक सम्बुध्दाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून माणसाला शोभेल असे बुध्दांशी सुसंगत असं आचरण करणं. ज्यामधून एक चांगला आदर्श आपण इतरांसमोर ठेवू शकू. बुध्दाने सांगितलेल्या सम्यक मार्गाचा अवलंब करुन तो आचरणात आणून आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांसाठी काही सुखपद अनुभूती आपण आपल्या आचरणातून इतरांसाठी निर्माण करु शकु असे आचरण आपणाला निर्वाणपदापर्यंत घेऊन जावू शकले नाही तरी आपले आचरण इतरांसाठी त्रासदायक होणार नाही. इतकी तरी काळजी आपण घेतली पाहीजे. हा धम्म समजून घेतांना, धम्माची तत्वे, धम्माचा उद्देश आणि धम्माचं प्रयोजन काय ? याबाबीवर प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते. धम्माची तत्वे म्हणजे धम्माची संहिता. ही संहिता जोपासण्यासाठी त्यामागचा उद्देश , महत्वाचा आहे. ही संहिता कशासाठी? या संहितेमध्ये आपल्या , आचरणाबद्दलची कटीबध्दता अधिक दृढ होण्यासाठी काही बंधने आपल्याला स्वतःसाठी घालून घ्यायची आहेत. त्यासाठी धम्माचं प्रयोजन काय? हे समजून घेणं गरजेचं आहे. ‘बुध्दं शरणं गच्छामी…’ आपण अनेकदा प्रसंगानुरूप म्हणत आलो. कुठलाही आपल्या जीवनातला जन्मापासून मरेपर्यंत असा संस्कार असला की आपण..’ बुद्धम् शरणम् गच्छामि..’ म्हणत असताना आपण हे का म्हणतो आहोत याची जाणीव झाली पाहिजे . त्याचा अर्थ कळला पाहिजे आणि त्या मागची आपली आचरण, विचाराची भूमिका आपण स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. . बुध्दं शरणं गच्छामी… हे पाली भाषेतले शब्द आहेत. हे उच्चारतांनाच आपल्या मनात आचरणशीलता निर्माण होत असल्याची अनुभूती व्हावी, असे अपेक्षित आहे. याचा अर्थ मी बुध्दाला शरणं जातो किंवा मी बुध्दाला अनुसरतो. बुध्दाने सांगितलेल्या सर्व तत्वांचा अवलंब करतो,
तसे आचरण करण्यास मी कटीबध्द आहे. पंचशील, त्रिशरण, अष्ठगाथा समजून घेणे, त्यातला अर्थ कळला की त्या मागची आचरण करण्याची भूमिका आपल्याला घेता येते. बुध्दाने दिलेलं पंचशील म्हणजे बुध्दासमोर आपण आपल्या जीवन कल्याणासाठी दिलेली वचनेच होत. आणि जर मी बुध्दाला शरण जातो किंवा अनुसरतो म्हटले की, तशाप्रकारचे आचरण करण्याची जबाबदारी आपोआपच वाढलेली असते. जेंव्हा आचरणासहीत आपणही जबाबदारी पार पाडतो तेंव्हा आपसुकच धम्माप्रति तुमची एकनिष्ठता वाढते आणि तुम्ही सहजच म्हणू शकता, अधिकार वाणीने समाजालाही सांगू शकता की, ‘नत्थी में सरणं अय्यं …. बुध्दो में सरणं वरं…’ म्हणजे माझे बुध्दाशिवाय दुसरे कोणतेच अधिष्ठाण नाही किंवा मी बुध्दाशिवाय कुणालाच शरण जात नाही की, बुध्दाशिवाय कुणालाच अनुसरत नाही. ही कटीबध्दता, कट्टरता आपोआपच आपल्यात निर्माण होते.
मी बौध्द आहे आणि ही बंधने पाळणे माझं कर्तव्य आहे. याहीपेक्षा ही वचने पाळल्याने माझ्या जीवनाचे कल्याणच होणार आहे किंवा ही वचने मी पाळली नाही तर मला दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. ही भीती नव्हे तर जाणिव झाली. माझ्या जीवनाचे कल्याण,माझ्या जीवनात सुखाचे क्षण येणारच आहेत. माझं जीवन मंगलमय होणार आहे. हा दृढविश्वास आपल्यात निश्चितच निर्माण होईल. डॉ. बाबासाहेबांनी धम्म देण्याआधी आपण कसे होतो आणि आता कसे आहोत, ही कल्पना केली की आपल्याला आपण बौध्द असल्याच्या जाणिवा आणि जबाबदाऱ्या सहज समजणे अपेक्षित आहे. पाणातिपाता वेरमणी-सिक्खापदं समादियामी…
मी प्राणीमात्राच्या हिंसेपासून विरक्त राहण्याची प्रतिज्ञा करतो किंवा वचन देतो. मी प्राणीमात्राच्या हिंसेपासून विरक्त राहण्याचे वचन का बरे देत आहे ? हे एकदा मला कळलं की मी ती प्रतिज्ञा, ते वचन सहज पाळू शकतो किंवा ते पाळणे हा माझ्या जीवनाचा एक भागच होऊन जाऊ शकतो. ती सहजता माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग बनून जाते. __ ‘अदिन्न दाना वेरमणी, सिक्खापदं समादियामी’… मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. चोरी केल्याने माझे कसे नुकसान होणार आहे याची आधीच जर मला जाणिव झाली तर हेही वचन मला जीवनभर अंगिकारुन माझे जीवन मंगलमय करता येऊ शकते. म्हणून त्या त्या वर्तनामागील परिणामाची जाणिव होणे महत्वाचे आहे. ‘कामेसुमिच्छाचारा वेरमणी, सिक्खापदं समादियामी..’
मी कामादि मिथ्या वर्तनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा घेत आहे. सदर आचरणामुळे माझे नैतिक अधःपतन होऊ शकते आणि मी समाजाच्या नजरेतून पडू शकतो म्हणून मी कामोत्तेजक वाईट आचरणापासून दूर राहीले पाहीजे ही जाणिव जेंव्हा माझ्यात निर्माण होईल, त्या वचनाला मी चांगल्याप्रकारे समजून घेईल तेंव्हा मी त्या आचरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. _ ‘मुसावादा वेरमणी, सिक्खापदं समादियामी..’
मी खोटे बोलण्याचा किंवा खोटा व्यवहार, आचरण करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा घेतो. अथवा तसे वचन देतो आहे. यामागची ही जाणिव होणे महत्वाचे आहे. खोटे बोलण्यामुळे माझे होणारे नुकसान मलाच माहीत झाले असेल तर मी ते पुन्हा न करण्याचा मनाशी दृढ निश्चय करेल. _ ‘सुरा मेरय-मज्ज पमादठाना वेरमणी, सिक्खापदं समादियामी…’
मी दारु अथवा तत्सम नशिल्या पदार्थाच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा घेतो, वचन देतो. दारुच्या अति आहारी गेल्यामुळे शारिरीक हानी, चारित्र्याची हानी आणि व्यसनाधिनता वाढून माझे जीवन
नरक बनण्यास वेळ लागणार नाही, याची जाणीव मला झाली आहे आणि म्हणूनच मी या वाईट आचरणापासून विरक्त राहण्याची प्रतिज्ञा घेत से आहे. पंचशीलेची जीवनसुत्रे पाळत असल्याची प्रतिज्ञा जर मी जाणिवपूर्वक घेत असेल तर मला धम्म आणि धम्मनिष्ठा समजायला वेळ लागणार नाही.
मग मी सहजच ही खुणगाठ माझ्या मनाशी बांधेल की, आता बध्द. वा धम्म आणि संघाशिवाय मी कुठल्याच अधिष्ठाणाला मानणार नाही, रे अनुसरणार नाही. बाकी बुध्द, धम्म, संघ ही त्रिसरणे माझ्या अंगी आपोआपच अनुसरण्याची आणि ती इतरांना सांगण्याइतपत प्रज्ञा मला प्राप्त होईल. धम्माबद्दलची गोडी माझ्यामध्ये सहजरित्या निर्माण होईल.
मी पहिल्यांदा बुध्दाला, धम्माला त्याच्या संघाला शरण जात असल्याची प्रतिज्ञा घेत असतांना मी ती किती जाणिवपूर्वक घेत आहे;हे अधिक भक्कमपणे माझ्या मनात रुजावे यासाठी मी दुसऱ्यांदा बुध्दाला, धम्माला आणि संघाला शरण जाण्याबाबतचं उच्चारण करतो. तरीही ती माझ्यातली जाणिव त्याहीपेक्षा अधिक दृढ व्हावी म्हणून मी अतिशय नम्रपणे तिसऱ्यांदाही जाणिवपूर्वक शरण जाण्याची वा आचरण करण्याची, अनुसरण्याची प्रतिज्ञा घेत आहे किंवा वचन देत आहे. म्हणजे मी माझ्या मनाची विचलित अवस्था स्थिर होण्यासाठी मी अतिशय जाणिवपूर्वक ही वचने दिली आहेत, हे माझ्याच मनात अधिक बिंबवण्यासाठी मी दोन-तीन वेळा उच्चारण करतो आहे. यामागे माझी धम्मनिष्ठा अधिक बळकट व्हावी. मी बुध्द, धम्म विचारांशी पूर्वपेक्षाही एकनिष्ठ, धम्मनिष्ठ व्हावं यासाठी माझ्या या बुध्द वंदनेचं प्रयोजन आहे. हे मला कळलं की मी बौध्द असल्याची जाणिव थोडीतरी माझ्या मनात निर्माण झाली असं समजण्यास हरकत नाही. पण तरीही एवढ्यानेच आपण बौध्द झालो असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. त्यासाठी आचरणाचा महत्वाचा टप्पा आणखी गाठायचे बाकीच आहे. – खरी कसोटी आहे कोणत्याही बिकट प्रसंगी वा जगाच्या नजरेतून ज्याला संधी समजून त्याचा आस्वाद घेण्यापासून किंवा त्याचा लाभ घेण्याची तृष्णा दमन करुच शकत नाही, किंवा तो लोभ गळून जाऊच शकत नाही, अशा सर्व सामान्यांच्या मानसिकतेत सदैव निर्माण होणाऱ्या तृष्णात्मक भावना, विकार याचं दमन करुन कुठल्याही परिस्थितीत बुध्द तत्वाशी तडजोड न करता त्यापासून अलिप्त राहणं याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याबरोबर इतरांनाही येईल, असे वर्तन, असे आचरण करणं बौध्द माणसाचं खरं कर्तव्य आहे. हीच खरी परीक्षा आहे. परिक्षेत आपण अनेकवेळा पास झालो म्हणजे आपणास ती अनुभूती असल्याने आपण इतरांना धम्म सांगण्याच्या किमान पात्रतेचे झालो असे तरी म्हणता येईल. बुध्द धम्माच्या सर्वच संहिताचा निदान अभ्यास तरी केला म्हणजे ही संहिता कशी आहे. त्याबाबतचे आचरण करण्याबाबत आपण थोडतरी सजग असू म्हणून धम्म समजून घेण्यासाठी धम्म संहितांचे वाचन महत्वाचे आहे.
आज संगणकाच्या युगात माणसाचं वाचन कमी झालं. अवतीभवती चंगळवादाचं जीवन भौतिक अनावश्यक सुविधाचा अतिरेकी वापर यामुळे बाबासाहेबांच्या स्वप्नातील बौध्दमय भारताची स्वप्नपूर्ती काही अर्थी अडचणीची जी बैठक आहे ती बैठक आणि आपसांतील संवाद, विचार विनिमय करण्यासाठी कुणाकडेच वेळ नसल्याची परिस्थिती दिसते आहे. त्यामुळे बुध्द धम्म प्रसार-प्रचारासाठी वेळ, पैसा आणि एकत्रीत बैठक झाल्याशिवाय गत्यंतर नाही. समाजमाध्यमे मोबाईलच्या माध्यमातून फक्त ‘फॉरवर्ड’ धोरणामुळे मला त्यातलं गांभीर्य नीट समजून घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेबांच्या रुपानं बौध्द समाजात जो सूर्योदय झाला त्याचा फायदा इतरही समाजबांधवांना व्हावा यासाठी धम्म प्रचार-प्रसार चांगल्या पध्दतीने व्हावा, याची जबाबदारी आता प्रत्येकावर येऊन ठेपली आहे. एकदा आपण बौध्द असल्याची जाणिव निर्माण झाली की, त्याबाबतची आपली जबाबदारी काय? हेही कळायला उशीर लागणार नाही. _ मी बौध्द म्हणून घेतांना माझी जबाबदारी आहे की, मी ज्या स्थितीत आहे. माझी पात्रता काय आहे. बौध्द म्हणून मी काय करायला पाहिजे. माझ्याकडून इतरांनी काय अपेक्षा ठेवल्या असतील..? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा जराही प्रयत्न झाला तरी चांगलेच विचारमंथन होऊन त्या जबाबदारीच्या पूर्ततेसाठी मी माझी योग्य ती दिशा ठरविण्यासाठी धडपड करीत राहील. मी बौध्द झालो असेल तर मी बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं कुठल्याही परिस्थितीत पालन करणे आवश्यक आहे. मी अंधश्रध्दा वाढीस लागेल अशा कुठल्याही गोष्टीला थारा देता कामा नये. माझ्यामुळे माझ्या समाजबांधवांत कुठलाही संभ्रम निर्माण होणार नाही असे सद्वर्तन करणे मला अपेक्षित आहे. माझ्याकडे मदत करण्याची क्षमता असेल तर मी मागे राहीलेल्या माझ्या समाजबांधवांसाठी अथवा मानवतेच्या दृष्टीने जे कोणी माझ्याकडून अपेक्षित मदत गृहीत धरुन आहेत, त्यांच्याप्रति यथाशक्य मदत करणे माझी जबाबदारी आहे. धम्माची हानी, त्याचा -हास होण्यास कारणीभूत असलेल्या मला समजलेल्या बाबी वा तत्सम प्रवृत्ती वाढीस लागू नये यासाठी प्रयत्न करणे किंवा तशी भूमिका राबविणे ही माझी जबाबदारी असली पाहीजे. इतःपर शिकल्या सवरल्या माणसांनी आपल्याच कुटूंब कबिल्यात गुंतून न राहता समाजातील अज्ञानी, निर्धन किंवा ज्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी मदत आवश्यक आहे अशांसाठी संयुक्तपणे मदतीचा निधी निदान – आपल्या गावासाठी उभारला पाहिजे.
खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसे प्रबोधन, शिबीरे आयोजित केली पाहिजेत. बुध्दांचा अनित्यतावाद, अनात्मवाद, प्रतित्यसमुत्यवाद, लोकांत रुजवून त्यांना तर्कशुध्द विज्ञाननिष्ठ विचार करण्यासाठी व ते आचरणासाठी प्रवृत्त
केले पाहिजे. पुढच्या पिढीच्या हाती बाबासाहेब देतांना आपणही योग्यरितीने – बाबासाहेब, तथागत बुध्द समजून घेतले पाहिजेत तरच आपण आपल्या मुलांना आगामी काळात उद्भवणाऱ्या संकटांशी विशेषतः विषमतेची बिजे निरंतर पेरणाऱ्या प्रवृत्तीशी सामना करण्याचं बळ त्यांच्यात निर्माण करु शकू. म्हणून आपण आता पूर्वीचे महार राहीलो नसून प्रबुध्द झालेलो आहोत. आपण बौध्द असल्याची खरी जाणिव आपणात आणि आपल्या भावी पिढीत आतापासूनच उत्पन्न न झाल्यास पुन्हा तोच मागील इतिहास आपल्या समोर परत उभा राहल्याशिवाय राहणार नाही. आपल्या – हक्क, अधिकार, आरक्षण, संविधानातील तरतुदीबद्दल आणि त्याप्रकारच्या व्यापक अभ्यासाबद्दल आपणही आणि आपल्या भावी पिढीला ही जाणिव करुन देणं फारचं अगत्याचं आहे. नोकरी मिळण्याच्या दृष्टीने केलेल्या तांत्रिक, व्यवसायिक अभ्यासापेक्षा मागील इतिहासाचं अध्ययन करणं समाजहितासाठी, समाज वाचविण्यासाठी फार महत्वाचं आहे. इतिहास विसरता कामा नये. आपल्या स्वतःची जाणिव, आपलं या जगात अस्तित्व असल्याची जाणिव त्यातली मानवतावादी, समतेच्या विचाराची ऊब आपल्याला सदैव सचेतन, जागृत आणि जिवंत ठेवत राहील. माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देत राहील, यात काही शंका नाही…
नमो बुध्दाय ! नमो धम्माय ! नमो संघाय…!
प्रा.नंदू वानखडे
मुंगळा जिल्हा वाशिम
-9423650468

Thank you for reading this post, don't forget to subscribe!