अमरावती : पवित्र प्रणालीव्दारे सुरु असलेल्या शिक्षक भरतीत मागासवर्गीयांची 50 टक्के पदे कपात करण्यात आली होती. ही पदे भरण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत असे निवेदन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.
या मागणीबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून पाठपुरावा होत आहे. या अनुषंगाने त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाकडून मागासवर्गीयांची पदे भरण्याबाबत आवश्यक अहवाल व प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मागासवर्गीयांची 50 टक्के कपात करण्यात आलेली शिक्षक पदे भरती करण्यात यावीत. याबाबत डि.टी. एड., बी.एड. स्टुडंट असोशिएशनच्या अमरावती जिल्हाध्यक्षांकडून निवेदनही प्राप्त झाले आहे.
त्यामुळे शालेय शिक्षण विभागातील संबंधितांना आदेश व्हावेत व मागासवर्गीयांची कपात केलेली शिक्षक पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे.
पवित्र प्रणालीव्दारे सुरु असलेल्या शिक्षक भरतीत मागासवर्गीयांची पदे भरावी -महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Contents hide