नितीन गडकरींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : महाराष्ट्र भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिवसभरात शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त आमदार, औरंगाबादचे नामांतर अशा अनेक विजयांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात कठोर टीका होत आहे. अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांनी एकाच दिवसात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेते ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. यावेळी गडकरी यांनी मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार होते. युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विकासामध्ये नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा होता.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!