• Tue. Sep 26th, 2023

नव्या वाटेवरील प्रवास हा…

ByGaurav Prakashan

Jan 23, 2021

जन्म घेतला मातेच्या उदरी
कसे फेडावे आई तुझे पांग
करीन सेवा मी वृद्धपणात
आई मोकळ्या मनाने सांग
आई-बाबांच्या मांगल्यमय एकरूपतेतून फलित झालेला हा अंश आणि आईच्या गर्भाच्या सुरक्षित विश्वात निर्मिला गेलेला हा नाजुक, कोमल अवयवबंध . देवाजीची अजब लीलाच न्यारी! बेंबीला जोडलेल्या नाळेतुन आईने सेवन केलेल्या सर्व पोषक घटकांतून पोषक बनलेला हा आईबाबांच्या रक्तांमासाचा अंश मी, नऊ महिने नऊ दिवस गर्भपिशवीत उबाऱ्याला राहिले.कन्यारत्न म्हणुन जन्माला येण्याच्या प्रतिक्षेत पोसली जात होते.आई पोटावर हात फिरवून मला माया प्रेम अर्पण करत होती.बाबाही आईला जीवापाड जपत होते.सर्वांना माझ्या बाहेरच्या जगात येण्याची उत्सुकता लागुन राहिली होती. माझ्या जन्माचे स्वागत करून प्रेमाने लालन पालन करण्याची सर्वांनाच असं लागुन राहिली होती.
आईने नऊ महिने नऊ दिवस तिच्या गर्भाच्या उदरात मला पोसवले आणि फुलाप्रमाणे जपले. माझा जन्म झाल्यानंतर तळहातावरच्या फोडावाणी माझी काळजी घेतली .माझ्या सर्व सेवा सुविधाही पुरवल्या, शिक्षण दिले खाणेपिण्याचेही लाड केले. आपल्या हाताचा पाळणा आणि डोळ्यांच्या ज्योती करून माझे बालपण अंजारत गोंजारत घालवले. किती भाग्यवान मी अशा आईबाबांच्या पोटी मी जन्माला आले! सर्व प्रकारच्या आपल्या कर्तव्यांची पूर्ती करून माझ्या विवाहचेही त्यांनी नियोजन केले. ‘मुलगी हे परक्याचे धन’ हे समजून देखील त्यांनी मला उच्च शिक्षण दिले. माझ्यासाठी बेसुमार पैसा खर्च केला.आता त्यांच्या वृद्धत्वाची काठी होणे माझे कर्तव्य आहे. त्यांचे गलितगात्र झालेले शरीर दुबळे झाले आहे. त्याची सेवा करणे माझे परम कर्तव्य आहे.मी ते पार पाडणारच आहे.
ओलांडून उंबरा आज
आले मी सासरघराला
देईन प्रेममाया सदाच
सुर लागतील सुराला
ती आली,तिने पाहिले,तिने जिंकले.अशीच काहीशी तुमची अवस्था झाली होती.मला पहायला म्हणुन आलात नि माझे काळीजच चोरून नेलेत.’ केले तर लग्न हिच्याशीच,नाही तर लग्नच करणार नाही’ अशी विनंतीवजा धमकीच दिलीत घरात.मग काय विचारता!……
“मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी”
त्यामुळे हुंडा वगैरे न घेता तुम्ही माझ्याशी लग्नाला तयार झालात. माझे शिक्षक असणाऱ्या वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण चार मुलींच्यापैकी मी पहिलीच मुलगी. एवढे मोठे स्थळ आलेलं पाहून किती हुंडा द्यावा लागेल याची त्यांना मनात शंका होती……
मंगल अक्षता पडताच भटांनी
म्हटलेले शुभमंगल सावधान
नव्या वाटेवरचा करता प्रवास
ठेवावे लागणार होते अवधान
दोनच दिवसात तुमच्याकडून निरोप आला. लग्नाच्या तयारीला लागा…. तुम्ही नारळ द्यायचा आणि आम्ही मुलगी न्यायची. तरीही बाबांनी हौसेने त्यांच्या परीने बऱ्यापैकी खर्च करून माझे लग्न थाटात करून दिले…..
लक्ष्मीच्या पावलांनी मी तुमच्या घरात प्रवेश केला. सुख, समाधान आणि संपत्तीने मी भारावून गेले.नव्या वाटेवरील प्रवास हा सुखकर होण्यासाठी मी माझ्या आयुष्यात पुर्णपणे झटले.मांगल्याचा हा प्रवास चिमणपावलांनी आणखी सुरेल झाला.त्यांच्या बाललीलांनी माझे विश्व कधी व्यापून गेले हे मलाही कळले नाही.दुडचदुडू धावणारी त्यांची पावले कधी बाबांच्या पावलांएवढी झाली आणि त्यांच्या जीवनाच्या कक्षाही रुंदावल्या हे ध्यानात येईतोवर त्यांच्या ही लग्नाची बोलणी करण्याची वेळ आली.
पुन्हा एका मुलीचा नव्या वाटेवरून प्रवास सुरू होणार होता. भूतकाळ जणू भविष्यकाळ होऊ पहात होता…….अन् माझी वाटही आता थोडी रेंगाळली होती,मळली होती, अंमळ सुस्त झाली होती. नव्या वाटेवरून येणारणीचे स्वागत करण्यासाठी…………

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835