जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात एका तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावरून चांगलेच महाभारत घडले. तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन निवडणूक निर्णय अधिकार्यांनी तो अर्ज बाद केला. यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथींनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला.
जळगाव तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली होती. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेत अर्ज बाद केला. तृतीयपंथी असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातूून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिला. या कारणावरून अंजली पाटील यांनी संताप व्यक्त केला. आपला अर्ज चुकीची हरकत घेऊन बाद केला आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा दावा त्यांनी केला.
अंजली पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे सहकारी तथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमिभा पाटील यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्यांना जाब विचारत गोंधळ घातला. एका तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक लढवू नये, याबाबत राज्य निवडणूक आयोगाचा काही निर्णय आहे का? असेल तर तसे लेखी द्यावे, अशी मागणी शमिभा पाटील यांनी केली. जोवर अंजली पाटील यांच्या निवडणूक अर्जाविषयी योग्य तो निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण तहसील कार्यालयातून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे अधिकार्यांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी पत्रकारांकडे आपली बाजू मांडताना तृतीयपंथी अंजली पाटील यांनी सांगितले की, मी एक तृतीयपंथी आहे. सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे.
तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावरून जळगाव तहसील कार्यालयात गोंधळ
Contents hide