• Sun. May 28th, 2023

तीळ खाण्याचे फायदे…!

ByBlog

Jan 11, 2021

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला आणि त्यातील आहाराला शास्त्रीय महत्त्व आहे. थंडीमध्ये येणार्‍या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे हे आपल्यातील अनेकांना माहित असेल. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ असून त्याचे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. पांढर्‍या तीळातही पॉलिश केलेले आणि न केलेले असे आणखी दोन प्रकार पहायला मिळतात. यामध्ये पॉलिश केलेले तीळ आरोग्यासाठी जास्त चांगले असतात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत अवश्य तीळ खावे.
१. अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.
२. याचे आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदे असतात त्याचप्रमाणे त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात. तीळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.
३. ज्यांची त्वचा एरवीही कोरडी पडते त्यांनी एरवीही थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.
४. मात्र ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत. ज्यांना मधुमेह आहे अशांनी संक्रांतीच्या काळात तीळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
५. तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.
६. याबरोबरच आपण भाजीला दाण्याचा कूट घालतो त्याऐवजी थंडीमध्ये तीळाच्या कूटाचा वापर केल्यास तोही फायदेशीर ठरतो. यामुळे भाजीला एक वेगळी चव येते.
७. थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.
८. बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. यामुळे पुरेसे दूध येण्यास उपयोग होतो.
९. ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
१0. दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *