• Mon. Sep 25th, 2023

तांत्रिक अडचणी ‘ऑन स्पॉट’ दूर करुन प्रतिदिवसाचे उद्दिष्ट पूर्ण करा – विभागीय आयुक्त पियुष सिंह

ByGaurav Prakashan

Jan 20, 2021

अमरावती : कोरोना लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक आहे व त्याद्वारे व्यक्तींना ओटीपी नंबरच्या माध्यमातून सूचना दिली जाते. या प्रकियेत कुठलीही तांत्रिक अडचण उदभवल्यास ती तत्काळ दूर करावी. केंद्रावर नियोजनानुसार उपस्थित व्यक्तीची नोंदणी न झाल्याचे आढळल्यास त्याच ठिकाणी नोंदणी करुन लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे दिले.
शासनाच्या निर्देशानुसार कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आठवड्यातुन चार दिवस ‘हेल्थ वर्कर्स’ चे लसीकरण होत आहे. विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी आज जिल्हा रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय येथील तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद निरवणे, अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ.विशाल काळे, डॉ. सतिश हुमणे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी लसीकरणासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकातून पडताळा घेतला व तांत्रिक बाबींची माहिती घेतली. ते म्हणाले, की शासनाने निश्चित केलेल्या दिवसांना नियोजित वेळेनुसार लसीकरण व्हावे. शंभर व्यक्तींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे, ते पूर्ण व्हावे. एखाद्याची नोंदणी नसेल तर ती तत्काळ तिथेच करुन घ्यावी. मात्र दिवसाचे किमान उद्दिष्ट गाठता आले पाहिजे. यावेळी श्री. सिंह यांनी लसीकरण केंद्रातील निरीक्षण कक्षाचीही पाहणी केली व तेथील लस घेतलेल्या व्यक्तींची विचारपूस केली. लस घेतल्यावर घरी सात दिवसांपर्यत घ्यावयाची काळजी आणि स्वनिरीक्षणाबाबत व घ्यावयाच्या नोंदीबाबत त्यांनी सूचना दिल्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!