• Wed. Sep 20th, 2023

तरूणाईचे स्पंदन : दीपस्तंभ

ByGaurav Prakashan

Jan 22, 2021

दैनिक बहुजन सौरभ वर्तमानपत्र नागपूरच्या गर्भजाणिवेतून स्फुरलेल्या बहुजनाचा बुलंद आवाज असून संपूर्ण बहुजन समाजाच्या अंतरंगातील भावस्पंदन टिपणारा नवा समाजआरसा आहे.या दैनिकाने मला तरूणाईचे स्पंदन हा कॉलम लिहण्यासाठी जी जबाबदारी दिली त्याबद्दल संपूर्ण टिमचे व संपादकाचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
बदलत्या संक्रमण अवस्थेच्या काळात तरूणाईचे स्पंदन आंदोलित होत असून वर्तमानाच्या अनोगोंदी सामाजिक,राजकिय,आर्थिक शैक्षणिक कारभाराने त्यांच्या मनात विचारांचे काहुर माजले आहे. आज देश भयावह कोरोना महामारी असल्याने शैक्षणिक क्षेत्र पूर्णपणे पंगू झाले आहे.नव्या कोरोना स्टेन्सने पुन्हा नवीन आव्हान ऊभे केले आहे.भारतीय तरणांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने तो आज अस्वस्थ आहे.डिजीटल व ऑनलाईन साधनानी कार्य करत असला तरी हे ज्ञान फार उपयोगाचे नाही.सातत्याने ऑनलाईन असल्याने त्यांच्या मनावर गंभीर परिणाम होत आहेत.ईलेक्ट्रीक साधनाचा वापर कसा करावा याचे ज्ञान नसल्याने तो एकलकोंडा होत आहे.शाळा व महाविद्यालयातून मिळणाऱ्या जिंवत ज्ञानापासून आजचा तरूण दूर जात आहे.त्यामुळे तरूणाचे भविष्य अंधकारमय होत आहे.आभासी तंत्रज्ञानाने त्याच्या मानवीय संवेदना हरवून टाकल्या आहेत. येणाऱ्या अडीअचणीला त्याने मोठ्या हिंमतीने पूढे जावे.
भारत हा जगातील सर्वात तरूणाचा असलेला देश आहे.तरूणाईच्या जोरावर भारतानो मोठी क्रांती केली आहे.पण आज हाच तरूण स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहे.व्यवस्थेसोबत लढायला तयार झाला आहे कारण सरकारने खासगीकरण करून त्याच्या ज्ञानाला कप्पीबंद करून तुटपूंज्या मिळकतीवर संसार चालवावा लागत आहे.मनात अग्नीज्वालेचे कल्लोळ निर्माण झाले आहेत.तरूणाच्या ऊर्जेला दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.पण हेच तरूण स्वतःची ताकत लावून नवे परिवर्तन आणेल यात तिळमात्रही शंका नाही.
तरूण हा देशाचे भविष्य असतो.त्याच्या समोर कोणते आदर्श आहेत यावरून तो आपली वाटचाल करतो.समाजपरिवर्तनाच्या व देशाच्या क्रांतीकार्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा जोतीराव फुले,भगतसिंह,बिरसा मुंडा यांनी तरूणाईच्या उंबरठ्यावर आपल्या दिशा ठरवून जनक्रांती केली.नवे आत्मभान पेटवले.त्या आत्मभानातून नवा भारतीय समाज तयार झाला.आजच्या तरूणाने आपल्या सभोवतालच्या परिस्थितीच्या योग्य जाणीवाचा वेध घेऊन नवी क्रांती करावी.राजकारणातील फसव्या झगमगाटात न फसता भारतीय लोकशाहीला भक्कम करावे .कोणाचेही अंध भक्त न बनता नवे आव्हानाला नव्या तंत्रज्ञानाने पेलावे ह्यातच तरूणाईचे हित आहे.
तरूणाने समाजमनाचा आरसा व्हावे.मनातील स्पंदनाच्या आवेगातून नव क्रांतीची मशाल प्रज्वलीत करावी.शोषन करणाऱ्या अमानुषतेवर प्रहार करावा . कोणत्याही अंध रूढीत तल्लीन न राहता वास्तवाचे भान ठेवावे.तरूणाईच्या बळाचा उपयोग योग्य मार्गाने झाला तर भारताला नवे क्षितिज काबीज करता येईल.जाती,धर्म,पंथ,भाषा,व प्रदेश या वादात तरूणाने न पडता मी प्रथम भारतीय अंतिम भारतीय या न्यायाने वागावे.राजकारणातील नेत्यांच्या कटकारस्थानी चक्रव्युहात न फसता त्यांना त्यांची खरी जागा दाखवण्याची वेळ आली आहे.देशातील होत असलेल्या शेतकरी,कामगार आंदोलन,विद्यार्थी आंदोलन,संविधान बचाव आंदोलन या सर्व आंदोलनाला तरूणाईने साथ द्यावी.महविद्यालयात होणाऱ्या अत्याचारावर आपला आवाज उठवावा.कोणत्याही तरूणाला स्वतःचा जीव गमवावा लागणार नाही यासाठी महाविद्यालयानी संवाद तरूणाईसोबत हा उपक्रम घडवून आणावा.
वर्तमानातील ज्वलंत प्रश्नांना घेऊन नवे लढे द्यावे.समाजातील विषमतेला नष्ट करावे.मोबाईलच्या धुंदीत असणाऱ्या तरूणांनी नवे मूल्यमंथन करून भारतीय संविधानाची प्रेरणा घेऊन समाजात लोकशाही मूल्ये रूजवावी.समाजपरिवर्तनाचा खरा दीपस्तंभ होणे हेच तरूणाईच्या स्पंदनाचे क्रियान्वयन असावे असे वाटते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    “तरूणाईच्या स्पंदनाला नवे धुमारे फुटू द्या रे।
    ज्ञानाच्या नव क्रांतीने मन पेटू द्या रे।
    मानवाच्या माणूसकिचे नवे नाते जोडू द्या रे।
    प्रणयाच्या सहमीलनातून भेद श्रृखंला तुटू द्या रे।
    अंधाराच्या साम्राज्यावर लोकशाहीचा दीप लावा रे।
    तथागताच्या मानवतेचा संदेश मनी पेरू द्या रे।
    शिवबाच्या तलवारीने अन्यायावर वार करू द्या रे।
    समाजक्रांतीचा नवा दीपस्तंभ तरूणाईला होऊ द्या रे।”
    -संदीप गायकवाड
    नागपूर
    ९६३७३५७४००