अमरावती : प्रत्येक पुरुषाने ज्योतिबा फुले यांचा आणि महिलेने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेतला स्वतःसह कुटुंबाची व संपूर्ण समाजाची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमतीताई ठाकूर यांनी येथे केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त महिला व बालविकास विभाग व आर.सी.जे.जे. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशपांडेवाडी येथील शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह येथे ‘सावित्री उत्सव व कौतुक सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा
श्रीमती वंदना चौधरी, बाल न्याय मंडळाचे माधव दंडाळे,विभागीय उपआयुक्त अर्चना इंगोले, आर.सी.जे.जे. चे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महिला व बालविकास मंत्री यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सावित्रीमाई आणि ज्योतिबा होते म्हणून आपण महिला आज विविध क्षेत्रात आघाडीवर राहून काम करत आहोत. त्यांच्या कार्यापासून प्रत्येक महिला व पुरुषाने प्रेरणा घेतली तर संपूर्ण समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, सक्षमीकरण आदींसाठी महिला व बालविकास विभागाकडून राज्यात विविध योजना व उपक्रम अंमलात आणले आहेत. पुढील काळामध्ये जिल्हा नियोजनातूनही प्राप्त निधीपैकी 3 टक्के निधी हा महिला व बालविकासासाठी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावर महिला आयोगाचे कार्यालयसुद्धा लवकरच कार्यान्वित होण्याकरिता शिफारस करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘सावित्रीच्या लेकीं’चा गौरव
पुण्यात प्लेगची साथ आली असताना क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची शुश्रूषा केली. कोरोना संकटकाळात आपल्या जीवाची बाजी लावून अहोरात्र झटणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकीं’ना महिला व बालविकास मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कार्याचे प्रतिक म्हणून त्यांना स्मृतिचिन्ह देवून कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या महिला व बालविकासच्या योजनेअंतर्गत कुटुंबांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महिला व बालविकास विभागाच्या अमरावती विभाग कार्यालयांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ५ बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच महिला व बाल विभागातील बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांचे समाजामध्ये पुनर्वसन करण्यात आले असून त्यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
ज्योतीबा-सावित्रीमाईचा आदर्श घेतल्यास संपूर्ण समाज प्रगत होईल – महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर
Contents hide