- चांदवाThank you for reading this post, don't forget to subscribe!
- वाचकाच्या अंतःकरणी नांदतो चांदवा
- काळजाला काळजाशी बांधतो चांदवा
- वाचतांना नित्य ओठी रांगतो चांदवा
- सोसलेले सत्य कानी सांगतो चांदवा
- प्रश्न अवघे पेटलेले मांडतो चांदवा
- भेटण्याला हक्क अमुचे भांडतो चांदवा
- जीवनाची मज शिदोरी रांधतो चांदवा
- सत्यवादी शब्द हृदयी सांधतो चांदवा
- – प्रविण बोपुलकर
प्रत्येक कवीची कविता ही अनुभवलेल्या परिस्थितीतून,समाजात घडणाऱ्या घटनांवरून किंवा कल्पनेच्या आधारावरून जन्म घेत असते.
‘कविता म्हणजे अंतर्मनाचा आवाज’ अशी व्याख्या कवयित्री अंजली ढमाळ कवितेच्या बाबतीत करतात. आणि ‘ज्याचा त्याचा चांदवा’ वाचतांना प्रत्येक कवितेत त्याची अनुभूती वाचकाला येते.
या संग्रहातील बऱ्याच कविता मुक्तछंद स्वरूपात आहेत अर्थात त्या जशा आल्या अगदी तशाच कवयित्रीने त्यांना आपल्यापुढे आणले,ना वृत्ताचे बंधन आहे ना यमकाची जोडजाड अगदी खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारख्या निर्मळ आणि नितळ कुठल्याही बंधनात नसणाऱ्या.
वाचकाच्या मनात उत्सुकतेचे प्रतल निर्माण करणाऱ्या, विविधांगी विषयातून शब्दरूपी ब्रह्मकमळ फुलविणाऱ्या. वाचतांना कधी अंगावर शहारे आणणाऱ्या तर कधी अल्लड मुलांप्रमाणे अंगाखांद्यावर खेळणाऱ्या कवितांचा जेव्हा वाचक आस्वाद घेतो तेव्हा त्याच्या नजरेतून तो चांदवा त्याला दिसतो. त्यामध्ये कधी त्याला झळाळी दिसते तर कधी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचे बळ. कधी तो समाजातील षंढ वृत्तीवर आघात करतांना दिसतो. तर कधी बाई पणाची उलगडलेली घडी कधी साताऱ्याच्या मातीतला रांगडेपणा तर कधी कवितेचे आणि कवयित्रीचे गुपित. कधी त्याला दिस भरलेल्या गर्भारशी सारखा भरून आलेला पाऊस दिसतोअशा सर्वांगसुंदर भावनेने वाचक सुखावतो
आणि मग खऱ्या अर्थाने ‘ज्याचा त्याचा चांदवा’ हे शीर्षक सार्थ ठरते.
कवयित्रीच्या लिखाणातून ग्रामीण भागातील सण’ उत्सव संस्कृतीचा सुगंध पदोपदी मनाला मोहावून टाकतो, मुळ्याच्या सणाला बैलांसाठी खांदा मळणारी कवयित्री कृतज्ञतेची भावना व्यक्त करून जाते, ‘सण मुळाचा’ या कवितेत कवयित्री फार सुंदर लिहिते…
- मुळाच्या वो या सणाला ।
- खांदा मळते वल्लभा।
- उपसले कष्ट ढीग।
- घेई विसाव्याची मुभा।
- झूल घालते ऐन्याची
- गळा माळ घुंगरांची
- बोट लावते तिटाचे
- दृष्ट लागू ने कुणाची
जीवन जगत असतांना फक्त शिक्षण महत्वाचे नसून माणुसकी देखील तितकीच महत्वाची आहे. फक्त शिक्षण घेऊन भावनांची चिरफाड करणारे शिक्षित व्यक्ती काय कामाचे? यापेक्षा जीवाला जीव देणारे अडाणीपण बरे….
ज्या मायबापांच्या भरवशावर मुलं शिकतात मोठे होतात आज मात्र त्यांनाच शहाणपणाचे डोस पाजतांना दिसणाऱ्या मुलांना कवयित्रीने कुंपणाची साल काढणाऱ्या तारेची उपमा दिलेली आहे.मातीशी नाळ विसरलेल्यांना त्यांची चूक लक्षात आणून देतांना आपल्या मनातील तीव्र सल व्यक्त करतांना कवयित्री लिहिते,
- जेवढी बुद्धीला तीव्र धार
- तेवढी वेदनांची चिरफाड जोरदार
- विखुरलेल्या तुकड्यांना
- कवेत घेणारे अडाणीपण
- एवढं महाग झालंय का?
- साल काढते रोपांची कुंपणाचीच मजबूत तार
- आणि तिच्या साथीला शहाणपणाचे डोस फार
एक स्त्री कवयित्री म्हणून बाईपणाचे अस्तित्व,तिच्या भूमिकेनुसार उलगडणाऱ्या घड्या अतिशय तरल पद्धतीने कवयित्री उलगडते.’बाई खूप काही’ या कवितेत पूर्ण बाईपणाचा प्रवास आपल्या समोर उलगडतांना दिसते,
- बाई-
- माप ओलांडून आत आली
- नव्या कोऱ्या लुगड्यासारखी
- लाडाकोडात वाढलेला तिचा कडक पोत
- मऊसूत होत गेला…
- संसाराच्या धबडग्याला सरावत गेला…
- आयुष्याच्या उन्हाळ्यात
- गाठोडी सोडली
- अशा कित्येक लुगड्यांच्या तुकड्या-तुकड्यांची
- गोधडी शिवली..
- पुढच्या पिढ्यांना ऊब देणारी
- रंगबिरंगी..मजबूत.. घट्ट विणीची..गोधडी… बाई
स्वतःची ओळख स्वतःचे अस्तित्व सिद्ध करतांना ‘कोण मी?’ यामध्ये कवयित्री फार सुंदर लिहिते,
- जातं नाहीये मी,
- पाहिजे तेव्हा गरागरा फिरवलं
- की भुसूभुसू पीठ देणारं
- झोपडीची मेढ नाहीये मी
- स्वतःला सोलून घेऊन
- खोल खड्ड्यात रोवून घेणारं
- मेढीचं जगणं नाहीये मी
- हे पर्वत,सागर,जगरहाटी
- माझ्यातून अवतरली
- मलाच येऊन मिळणारी
- स्वयंभू अस्तित्वाचा जागर
- क्षणाक्षणाला करणारी
- कणाकणास पूर्णत्वाची
- नितळ निळाई दावणारी
- सर्व हृदयांतली परिपूर्ण मी
या सर्व भावना व्यक्त करतांना विद्रोहाची किनार दिसून येते ती ‘टुकार जगणं’ या समाज व्यवस्थेच्या भिंती तोडून टाकण्याचे आव्हान करणाऱ्या कवितेत,
- रितं रितं करून टाक
- जेवढं शोषून घेता येईल
- तेवढं मला पिऊन टाक
- खंगळून खंगळून ओतून घेऊन
- भांडं सुद्धा मोडून टाक..
- उगवणाऱ्या प्रत्येक आशेचा कोंब
- कोवळा कोंब मुळासकट गाडून टाक
- रोज रोज टकरा घ्यायला लावणाऱ्या
- इच्छांची भिताडं पाडून टाक
अशा विविधांगी थाटात नटलेल्या ‘ज्याचा त्याचा चांदवा’ या कविता संग्रहात एकूण 120 कविता आहेत.
एकंदरीत या काव्य संग्रहातील तुमच्या जीवावर बाबा, कवितेच्या जन्मकळा, गुलमोहरा,तू माझा चांद पुनवेचा,निशब्द घाट,वेडा जीव, ही रात सृजनाची, वाघाची निवृत्ती, तुझं जाणं, आजही तुम्ही आहात,स्फुरण अद्वैताचे यासह सर्व कविता मनाच्या सरिपाटावर अधिराज्य करतात.
काव्यसंग्रहाचा शेवट करतांना जीवनात सकारात्मक जगण्याचा संदेश देणारी चारोळी कवयित्रीच्या दर्जेदार लेखनाची अत्युच्च पातळी आहे.
- उगवेल पुन्हा तोच चंद्र उद्याही पहाटे
- तोवर परि काळरात चालणेच आहे
- तीच चांदणी पुन्हा लखलखेल नभांगणी
- तोवर परि काळजास जाळणेच आहे..
पुन्हा आदरणीय कवयित्री अंजली ढमाळ यांना एकदा भावी वाटचालीस लक्षं लक्षं शुभेच्छा
- प्रविण जगन्नाथ बोपुलकर
- खेट्री, जि. अकोला
- मो. 7720945002