• Tue. Jun 6th, 2023

जो दिखता है, वही बिकता है..!

ByGaurav Prakashan

Jan 21, 2021

अशी म्हण आहे की, जो बोलत नाही त्याचे गहू विकल्या जात नाही व जो बोलतो त्याची मातीही विकल्या जाते. ह्या म्हणीचा मतितार्थ असा की, लोकांचे ध्यान आकर्षित केले तर सर्व काही विकल्या जातं. सध्याचे युग हे जाहिरातीचं युग आहे आणि आपण सर्व इडियट बॉक्स (टी.व्ही.) च्या विळख्यात अडकलेलो आहे. ह्यातून आपली सुटकाच होत नाही आहे. लहान मुलांना तर टी.व्ही. आणि जाहिरातींनी अगदी विळखून घेतलेले आहे. लहान मुलांच्या मनावर वारंवार जाहिरातींचा मारा होत असल्यामुळे त्यांना जाहिरात हेच अंतिम सत्य आहे अशी त्यांची मनोधारणा झाली आहे.
परवा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सौरभ गांगुली (दादा) ला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जाहिरात करत असलेल्या खाण्याच्या तेलाच्या कंपनीची पंचायत झाली. तीच गत काळ्याची गोरे करणाऱ्या क्रीमची सुद्धा आहे. एक वेळ ती क्रीम काळी होईल पण हा कधीही गोरा होणार नाही. तरी पण आपला ह्या जाहिरातीवर जाम विश्वास. नेमकं हेच ह्या कंपन्यांना भावत आणि ते आपला फायदा करून घेतात. अशीही म्हण आहे की, ” उथळ पाण्याला खळखळाट फार ” म्हणजे काय तर ज्याला थोडेफार ज्ञान आहे तो अधिक जाहिरातबाजी किंवा अधिक हुशारी (मिजास) दाखवितो. जो विद्वान असतो तो अगदी शांत असतो. तो जास्त बडबड करीत नाही. आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नाही.परंतु सध्याचा जमाना हा शांत बसण्याचा जमाना नाही. तो अधिक प्रस्तुत होण्याचा आहे.
प्रत्येक व्यक्तिमत्वाजवळ काही ना काही गुण असतातच. तो प्रत्येक व्यक्तिमत्वा पेक्षा आगळावेगळा (युनिक) असतोच. काही व्यक्तिमत्व हे अबोल असतं, शांत असतं. परंतु ह्या त्याच्या अबोल व शांत स्वभावामुळे यांच्यात काहीच गुण नाहीत असे होत नाही. कधी कधी तर बडबड करणारी, पुठे पुढे करणारी व्यक्ती ही ह्या अबोल व शांत जी की विद्वान असून सुद्धा केवळ दिखाव्याने पुढे निघून जाते. असे वाटते की हीच बडबडी, दिखाऊ व्यक्तीच विद्वान आहे. हाच अनुभव आपल्याला वेगवेगळ्या संस्था, कार्यालयात सुद्धा बघायला मिळतो. काही व्यक्तित्व हे बॉसच्या पुढे पुढे करणारे असतात. बॉस यांच्या साठी जणू देवच असतो. हे एवढे आज्ञाधारी असतात की, बॉसनी हुं म्हणायची देरी की हा धावलाच. बॉसला पण वाटत हाच गुणवान, कर्तव्यदक्ष एकटाच आहे. राजकारणात पण तेच. पुढे पुढे करणारेच पुढे जातात पण जे खरे गुणवान, कर्तृत्ववान व निष्ठावंत आहेत ते मागेच राहतात.
जाहिरातीच्या युगात दिसणं, सतत पुढे असणं, प्रस्तुत होणं हे लोकांना भावतं व जे दिसत तेच खरं असं मानायला लागतात. कोणी खोलात जाऊन अभ्यास करण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हणून तर मिठाईच्या दुकानाकडे बघितल्यावर आपल्याला काय दिसत तर हलवाईवाल्याने पारदर्शक कपाटात मिठाई अगदी व्यवस्थित रचलेली असते त्यामुळे ग्राहक आकर्षित होतो. पदार्थ दिसल्यामुळे त्याची खाण्याची व खरेदी करण्याची इच्छा होते. तेच कपड्याच्या दुकानाचे, मोबाईल, कॉम्पुटरचे तसेच आहे. जाहिरातीच्या युगात असे म्हटले जाते की, खरा विक्रेता तोच ज्याने केस नसलेल्या व्यक्तीला कंगवा विकला.
या जाहिरातीच्या व स्पर्धेच्या युगात जर आपल्याला सिद्ध करायचे असेल तर आपल्याला प्रस्तुत होणे फार गरजेचे आहे. प्रस्तुत होणे म्हणजे काय तर आपल्यातील हुशारी, विद्वत्ता, कौशल्य, प्रभुत्व, सृजनशीलता दाखविण्याची गरज आहे. कोणी येईल व आपली पारख करेल ह्या भ्रमात राहिलो तर आपण जगाच्या पाठी मागे राहू. ठराविक अंतराने किंवा वेळोवेळो आपल्यातील कौशल्य दाखविणे फार गरजेचे आहे. आपल्या देशात प्रत्येकच क्षेत्रात फार गुणवान, विद्वान, हुशार व प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यात भरपूर गुणवत्ता आहे. त्यांना फक्त योग्य ती संधी (प्लॅटफॉर्म) न मिळाल्यामुळे ते मागे राहिले आहेत. आज अशाच ह्या विद्वान, हुशार, गुणवान व प्रतिभावंतांनी पुढाकार घेऊन पुढे येण्याची व प्रस्तुत होण्याची गरज आहे कारण काय तर जमाना हा, ” जो दिखता है, वही बिकता है ” चा आहे…!

    अरविंद सं. मोरे,
    अतिथी संपादक
    गौरव प्रकाशन
    नवीन पनवेल (पूर्व)
    मो.९४२३१२५२५१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *