• Sun. Jun 4th, 2023

जिल्ह्यातआज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

ByBlog

Jan 8, 2021

अमरावती : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ड्राय रन घेण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते अकरा दरम्यान ड्राय रन घेतला जाणार आहे. त्यानुसार ड्राय रनमध्ये 25 व्यक्तींच्या नोंदी व तपासणी आदी प्रक्रिया होईल. प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, लसीकरण अधिकारी, निरीक्षक आदी सहा व्यक्तींचे पथक नेमण्यात आले आहे. या सर्वांना सकाळी सव्वाआठ वाजता केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ड्राय रनच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज सायंकाळी नर्सिंग स्कूलला भेट देऊन तेथील लसीकरण केंद्राची पाहणी केली. प्रत्यक्षात लसीकरण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी असावी व सर्व कार्यवाही अचूक व्हावी, या हेतूने हा ड्राय रन घेण्यात येत आहे. शासनाच्या सूचनांनुसार प्रत्येक कार्यवाही अचूकपणे व्हावी. लसीकरणाच्या वेळी एकही त्रुटी राहू नये म्हणून सर्व सूचना नीट समजून घ्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी निर्देश दिले.
पहिल्या टप्प्यात केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. लसीकरण शासन व आरोग्य विभागाद्वारेच होत आहे. कुठल्याही संस्था किंवा खासगी संस्थांद्वारे लसीकरण होणार नाही. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
क्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्रायरन घेतला जात असल्याचे डॉ. निकम यांनी यावेळी सांगितले.
जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम झाले. चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपींग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शितसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी एक ते चार आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली आहे.
या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर पंचवीस लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *