अमरावती : कोरोना लसीकरणाचा शुभारंभ 16 जानेवारीला होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील संबंधित केंद्रांवर आरोग्य पथक, रुग्णवाहिका व इतर यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
कोरोना लसीकरणाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले व आरोग्य खात्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
लसीकरणाच्या शुभारंभासाठी यापूर्वी जिल्ह्यात नऊ केंद्रे निश्चित करण्यात आली होती. तथापि, शासनाच्या सूचनेनुसार सहा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नव्या सूचनेनुसार जिल्हा रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालये, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व व्हीवायडब्ल्यूएस डेंटल कॉलेज अशी केंद्रे आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली.
लसीकरणाच्या शुभारंभाच्या दिवशीच्या अर्थात 16 जानेवारीच्या सत्रात प्रत्येक केंद्रावर शंभरजणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण सत्रे त्यानंतर घेण्यात येणार आहेत. त्यानुसार आरोग्य पथके व संबंधित सर्व कर्मचा-यांना पुन्हा परिपूर्ण सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी बैठकीत दिले.
जिल्हाधिका-यांकडून कोरोना लसीकरणाबाबत पूर्वतयारी आढावानव्यासूचनेनुसार शुभारंभाच्या दिवशी सहा केंद्रांवर लसीकरण
Contents hide