• Tue. Sep 26th, 2023

चित्रपट मेंदूतून नाही तर हृदयातून येतो

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021

पणजी : ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (आयएफएफआय) सांगता गोव्याच्या ताळीगाव मधील श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे रविवारी झाली. ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान आणि रवि किशन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता विश्‍वजित चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चित्रपट मेंदूतून नाही तर हृदयातून येतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
खासदार रविकिशन, आंतरराष्ट्रीय ज्युरीचे सदस्य, दिग्दर्शक प्रियदर्शन नायर, इफ्फी सुकाणू समितीचे सदस्य शाजी एन. करुण, राहुल रावेल, मंजू बोरा आणि रवि कोट्टरकर; आणि देश-विदेशातील मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सध्याच्या कठीण काळातही या महोत्सवाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो म्हणाले की, इफ्फीच्या या आवृत्तीने सर्व प्रकारच्या अडचणींवर मात केली आणि उत्कृष्टतेचे योग्य व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. यावर्षी सिनेमा वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे आला, असे सांगत त्यांनी संमिर्श स्वरूपात महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल इफ्फीचे अभिनंदन केले. या आवृत्तीच्या काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांचा आढावा घेताना ते म्हणाले, यावर्षी बांग्लादेश हा फोकस कंट्री होता. आपण महान दिग्दर्शक सत्यजित रे यांना भावपूर्ण र्शद्धांजली वाहिली.
इफ्फी सर्जनशीलतेचे सुंदर लक्षण असल्याचे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ , प्रतिनिधी आणि आयोजकांचे अभिनंदन केले. गोवा आता फक्त सूर्य, वाळू आणि समुद्रासाठीच ओळखला जाणार नाही; पर्यावरण-पर्यटनासह पर्यटनाला चालना देण्याबरोबरच राज्याच्या विकासासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. गोव्यात चौथा आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. ती एक राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा साक्षीदार बनण्याची उत्तम संधी असेल, असे ते म्हणाले.
इंडियन पर्सनालिटी ऑफ द इयर पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेते विश्‍वजित चॅटर्जी म्हणाले, मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी केंद्र सरकार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मनापासून आभार मानतो. यावर्षी, आम्हाला समजले की बांगलादेश हा आपला फोकस कंट्री आहे, ज्या देशाशी माझे खूप जवळचे संबंध आहेत. जेव्हा बांगलादेशवर हल्ला होत होता तेव्हा मुंबईत महान दिग्दर्शक ऋत्विक घ टक माज्या बरोबर होते आणि आम्हाला बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या भाषणांमधून प्रेरणा मिळत होती.
एका व्हिडिओ संदेशामध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले, जग एका अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करण्याचे इफ्फी हे एक उत्तम उदाहरण आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!