• Thu. Sep 28th, 2023

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

ByGaurav Prakashan

Jan 15, 2021

अमरावती : जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ३९७ सदस्य पदांच्या निवडणूकीसाठी आज सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत मतदान होणार असून, जिल्ह्यात यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.मतमोजणी सोमवारी (१८ जानेवारी) होणार आहे.ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पाळावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे.
कोरोनाची साथ लक्षात घेऊन प्रत्येक मतदाराने मास्कचा वापर करून निवडणूक कामकाजासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सर्व तालुका ठिकाणांहून मतदान केंद्रांकडे जाण्यासाठी पथके रवाना झाली व सायंकाळपूर्वी मतदान केंद्रांवर पोहोचली. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व मतदान केंद्रांचे व साहित्याचे सॅनिटायझेशन करण्यात आले.
प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी जागेची पुरेशी रचना व आरोग्य पथकांची उपस्थिती आदी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान जास्त असल्यास पुन्हा दुसर्‍यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन देऊन मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी मतदानासाठी बोलावण्यात येईल. त्याचप्रमाणे, कोरोनाबाधितांनाही अखेरच्या अर्धा तासात मतदान करता येईल. त्यासाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्थाही केंद्रांवर असेल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!