• Wed. Sep 20th, 2023

गोडी हलव्याची…!

ByGaurav Prakashan

Jan 19, 2021

हळदीकुंकवाची आमंत्रणं येण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे ओळखीच्या काकूंनी संक्रांतीच्या हळदीकुंकवाचं निमंत्रण दिलं तेव्हा थोडं वेगळंच वाटलं. ही बाई नोकरी सांभाळून कसं करणार हा विचारही मनात डोकावून गेला. पण नव्या सुनेचं कौतुक करण्यासाठी वेळ काढला असेल असा विचार केला आणि कामाला लागले. सांगितलेल्या दिवशी हळदीकुंकवाला पोहोचले. पाहते तो नवीन सून हलव्याच्या दागिन्यांनी नखशखांत सजलेली. मंगळसूत्र, हार, कुड्या, ठुशी, गजरा, बांगड्या, वाक असे दागने ल्यालेली आणि चंद्रकळा नेसलेली रमा अगदी लक्ष्मीसारखी दिसत होती. ‘काय गं सरिता, कुठून आणले हे हलव्याचे दागिने?
किती पैसे घालवले त्यावर’ त्यांच्या एका मैत्रिणीचा भोचक प्रश्न! त्यावर काकू हसल्या आणि कडेच्या खुर्चीत बसून हसतमुखाने सोहळा बघणार्‍या आपल्या सासूबाईंकडे हात दाखवून म्हणाल्या,’आमच्या आजींच्या हातांचा करिश्मा आहे हा. त्यांनी हौसेने केले सगळे दागिने..’ त्यांच्याकडचा हलवा जास्तच गोड का लागला हे तेव्हा समजलं!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!