• Sun. May 28th, 2023

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाची फरदड न घेण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

ByBlog

Jan 2, 2021

अमरावती : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाठी फरदळ न घेण्याचे आवाहन कृषी विभागाव्दारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यांनतर सिंचन उपलब्ध असलेल्या ठिकाणी कपाशीच्या शेतात पाणी देवुन पुनश्च कापुस पिक घेणे होय. अशावेळी पिकापासुन जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, किटकनाशके यांचा वापर करुन मार्च महिन्यानंतरही कापुस पिक घेतले जाते.
फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येवून गुलाबी बोंड अळीला तसेच मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशीला खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणखी मोठया प्रमाणावर होतो. डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे. डिसेंबरनंतर कपाशीचे पिक ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते, आणि अळीच्या जिवनक्रमाच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते. तसेच बि.टी. प्रथीनांचे प्रमाण कमी होवुन प्रतिकारकता निर्माण होते.
डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील पाच ते सहा महिने कापुस पिक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते व त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्तावस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापुस पिकावर अळीचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. या कारणास्तव कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदळ घेऊ नये. याकरीता कापुस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा (श्रेडरचा) वापर करावा आणि तयार झालेल्या पिकाचा चुरा गोळा करून सेंद्रीय खतामध्ये रुपांतरीत करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरटी करुन जमीन उन्हात चांगली तापु द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.
फरदड कपाशीमध्ये लागाणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही, त्यामुळे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटुन कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. कापुस पिकाचा कालावधी जसजसा वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथीनांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बोंडअळ्यामध्ये बीटी प्रधिनाविरुध्द प्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त राहील त्यामुळे पुढील खरीप हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फरदड न घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, विजय चवाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *