• Mon. Sep 25th, 2023

क्रेडिट कार्ड घेताय.?

ByGaurav Prakashan

Jan 15, 2021

नुकतीच नोकरी लागल्यानंतर क्रेडिट कार्ड घ्यावंसं वाटतं. पगारही चांगला असतो. क्रेडिट कार्डमुळे रोख रक्कम नसतानाही खर्च करता येतो. क्रेडिट कार्ड बाळगणं म्हणजे अनेकांना स्टेटस सिंबॉल वाटतो. पण दोस्तांनो, क्रेडिट कार्ड बाळगणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं सोपं नसतं. आपल्याला आपले खर्च आटोक्यात ठेवावे लागतात. तुम्हीही पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेण्याच्या विचारात असाल तर काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. क्रेडिट कार्ड घेतेवेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी..
सुरूवातीला प्राथमिक सोयी असणारं कार्ड घ्या. नो फ्रिल्स कार्ड म्हणजे कोणतंही वार्षिक शुल्क न आकारणारं कार्ड. अशा कार्डची निवड करता येईल. कमी आर्थिक र्मयादेचं कार्ड घ्या. सुरूवातीलाच अधिक र्मयादेचं कार्ड घेतल्यास तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता. कमी र्मयादेचं कार्ड घेऊन क्रेडिट स्कोअर बळकट करा. भविष्यात पगार वाढल्यावर अधिक र्मयादेचं कार्ड घ्या.
बर्‍याच बँका मुदत ठेवींवर क्रेडिट कार्ड देतात. समाजा तुम्ही एक लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली असेल. तर या रकमेच्या ८0 ते ८५ टक्के आर्थिक र्मयादेचं कार्ड तुम्हाला मिळू शकतं. क्रेडिट स्कोअर कमी असणारे किंवा कोणताही क्रेडिट स्कोअर नसणारे तरुण या पर्यायाची निवड करू शकतात.
तुमचं बचत खातं किंवा मुदत ठेव असणार्‍या बँकेचं क्रेडिट कार्ड घ्या. बँका आपल्या ग्राहकांचा क्रेडिट कार्ड अर्ज लवकर मंजूर करतात.
क्रेडिट कार्डासोबत बरीच शुल्कही येतात. तुम्हाला मासिक शुल्क, वार्षिक शुल्क भरावं लागतं. क्रेडिट कार्ड बिल वेळेत न भरल्यास बरंच व्याज आकारलं जातं. त्यामुळे या सगळ्या शुल्कांची माहिती करून घेतल्यानंतरच पुढे जा.
आपल्या गरजा, खर्च, परतफेडीची क्षमता या सर्व बाबी लक्षात घेऊनच क्रेडिट कार्ड घ्या. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड बाळगू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!