• Sun. May 28th, 2023

कोरोना लसीकरणाचा शनिवारी शुभारंभ

ByBlog

Jan 13, 2021

अमरावती : अमरावती कोरोनावरील लस उपलब्ध होत असल्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक टप्प्यात देशाचा प्रवेश होत आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम देशभर राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी मंगळवारी येथे दिले. कोरोना लसीकरणाचा शुभारंभ १६ जानेवारीला होणार आहे. त्यानुषंगाने पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात, पीडीएमसीचे वैद्यकीय अधिष्ठाता ए. टी. देशमुख, शिक्षणाधिकारी ई. झेड. खान, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. एस. आर. ठोसर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर व आरोग्य खात्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. लसीकरणाच्या शुभारंभासाठी जिल्ह्यात नऊ केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालय, अचलपूर, मोर्शी व दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालये, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महा विद्यालय, हायटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व व्हीवायडब्ल्यूएस डेंटल कॉलेज अशी केंद्रे आहेत. लसीकरण चार टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाच्या शुभारंभाच्या दिवशीच्या अर्थात 16 जानेवारीच्या सत्रात प्रत्येक केंद्रावर शंभरजणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण सत्रे त्यानंतर घेण्यात येतील. लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक असते. त्यामुळे या कामालाही गती देण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी व्यवहारे यांनी दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम म्हणाले की, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम टप्प्यात लस दिली जाईल. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. लसीकरणासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यानुसार कोविन अँपबाबत तंत्र प्रशिक्षण डाटा एन्ट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण घेतले जात आहे. लसीकरणासाठी आवश्यक पथकांनाही प्रशिक्षण देण्यात आले असून, यापूर्वी ड्राय रनदेखील घेण्यात आला. केंद्रावर आवश्यक आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची पथके उपस्थित राहतील. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन मान्यताप्राप्त लसींचा लसीकरण मोहिमेत समावेश आहे. लसीकरण हे अनिवार्य नाही, ते ऐच्छिक आहे. कोरोनावरील लसीमुळे मोठी उपलब्धी झाली आहे. कोरोनाबाधित व सध्या लक्षणे व अँक्टिव्ह रुग्ण असलेल्यांना ही लस देता येत नाही. अँक्टिव्ह रुग्णाची लक्षणे गेल्यानंतर १४ दिवसांनी त्याला लस देता येते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. ठोसर यांनी दिली. लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर (गृह, महसूल, होमगार्ड संबंधित अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी), तिस-या टप्प्यात हायरिस्क व्यक्ती व ५0 वर्षावरील व्यक्ती व चौथ्या टप्प्यात उर्वरित सर्व व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात सुमारे १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *