कोरोनादक्षतेचे नियम पाळून साजरा होणार प्रजासत्ताक दिन- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळूनच जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार शाखेने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी सकाळी सव्वानऊ वाजता होणार आहे. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्री महोदय राष्ट्रध्वजारोहण करतील. इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ सकाळी 8.30 ते 10 वाजतादरम्यान घेण्यात येऊ नये, असे आदेश आहेत. कुठल्याही कार्यालयाला ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी 8.30 पूर्वी किंवा 10 वा. नंतर करावा, असेही नमूद आहे.
कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत होईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आईवडील, तसेच कोरोना योद्धा जसे डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्यसेवक व आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रित करण्यात येईल.कोरोना साथ लक्षात घेता प्रभातफे-या, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. मात्र, विविध ऑनलाईन स्पर्धा, चर्चासत्रे, देशभक्तीपर निबंध, वादविवाद स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

000