• Mon. Sep 25th, 2023

कोणी मोठय़ा बापाचा असू द्या, सोडणार नाही

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021

पुणे : खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर तडीपार, मोका सारखी कारवाई करेन. कोणी मोठ्या बापाचा असू द्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकले म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी सावकारांना भरला.
बारामती येथील जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबा व कायदे मोडून व्यवसाय करण्यापेक्षा चांगला व्यवसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा. दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर कोणी सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना, माफी मागत आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला.
अंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार १00 रुपये साखरेचा दर झाला आहे. मात्र, सध्या साखर विकली जात नाही. आरबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार सहकार क्षेत्रासमोर वेगवेगळ्या अडचणी निर्माण करीत आहे. सहकारावर बंधने आणली जात आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. यामधून मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
बारामती शहर व तालुक्यात अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये कालवा सुशोभिकरण, शिवसृष्टी, चिंकारा पार्क, रस्ते, पूल, तीन हत्ती चौक सुशोभिकरण यामुळे बारामती शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. यामध्ये कोणाची जागा जात असेल तर त्याला विरोध करू नका. अतिक्रमण केले असेल तर नियमाप्रमाणे ते काढण्यात येईल. शहराचा कायापालट होत असताना आपल्या काही कल्पना असतील तर आम्हाला नक्की कळवा. चांगल्या कल्पनांवर काम करता येईल, असे अजित पवार म्हणाले. अजित पवारपालखी मार्गाच्या भूसंपादनासाठी ३५0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच हे काम होणार आहे. तसेच, शहरातील बसस्थानकाची इमारत देखील नव्याने उभी करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या पाच बसस्थानकामध्ये बारामतीचे बसस्थानक असेल, यापद्धतीने काम केले जाणार आहे. मात्र, ही विकासकामे होत असताना समाजातील कोणताही घटक त्यापसून वंचित राहणार नाही, याची देखील काळजी घेण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!