• Mon. Sep 25th, 2023

कृषी कायदे फायद्याचेच

ByGaurav Prakashan

Jan 30, 2021

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक करतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी कायदे फायद्याचे असल्याचे सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती बोलत होते. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती कोविंद यांनी उल्लेख केला. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. अभिभाषणात राष्ट्रपतींनी कोरोना आणि इतर संकटांचा उहापोह करताना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतूक केले. सरकारने योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारला शाबासकी दिली.
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राष्ट्रपतींनी भाष्य केले. सखोल चचेर्नंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आल्याचे ते म्हणाले. या कृषी सुधारणांचा फायदा १0 कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकर्‍यांना तात्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकर्‍यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता, असे राष्ट्रपती म्हणाले.
कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाच आदर करते. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुदैर्वी असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचे पालन करेल. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले.
नवीन कृषी कायद्यांची अंमलबजाणी करण्यापूर्वी जी व्यवस्था अस्तित्वात होती. जे अधिकार व सुविधा होत्या, त्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. उलट या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकर्‍यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत. कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत असल्याचे राष्ट्रपतींनी अभिभाषणातून स्पष्ट केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!