• Thu. Sep 21st, 2023

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच

ByGaurav Prakashan

Jan 28, 2021

मुंबई : कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प पुस्तकाचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेले आंदोलन आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम उद्धव ठाकरे यांनी उलगडला. आम्ही तेव्हाही कलानगरला राहत होतो. दादरला शिवाजी पार्कला जिथे घर होते तिथे मार्मिकची कचेरी होती. मी सात-आठ वर्षांचा होतो. गोळीबार, लाठीमार झाल्याचे फोन यायचे. पंढरीनाथ सावंत अर्शूधुराच्या रिकाम्या नळकांड्या घेऊन आले होते. आम्ही अडीच तीन वाजता घरी निघाल्यानंतर गाडीत बाळासाहेब, माँ आणि मी होतो. बाळासाहेबांनी आमची बॅग भरुन ठेवा, उद्या बहुतेक सुर्योदयाच्या आधी आमची उलचबांगडी होणार सांगितले आणि तसेच झाले, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.
पुढची १0 दिवस मुंबई धगधगत होती. आज आपल्याला तीच धग पुन्हा जागवायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात. कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचे नसते, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचे नामांतर करण्यात आले. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचे अधिवेशन केले जाते. हा न्यायालयाचा अपमान नाही का?, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो तसं कर्नाटक सरकार करत नाही. हा विषय केवळ तेवढ्यापुरता बोलण्याचा नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो मराठी लोकांवर अत्याचार करायचा यावर त्याचे दुमत नसते. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणारच असे एकत्रितपणे लढलो तर हा प्रश्न सुटेल, असा विश्‍वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!