• Sat. Jun 3rd, 2023

उर्दू माध्यम मुलींचे वसतिगृहाचे होणार पुनरुज्जीवन

ByBlog

Jan 6, 2021

अमरावती : अमरावतीमधील तसेच जिल्ह्याच्या विविध भागातील उर्दू माध्यमांचे शिक्षण घेणार्‍या मुलींना निवासी स्वरूपाची वसतीगृहाची सुविधा व्हावी, यासाठी कॅम्प स्थित जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक शाळा उर्दू कन्या अमरावती च्या आवारातील सद्यस्थित बंद पडलेले उर्दू माध्यम मुलींचे वसतीगृह सुरू होणे गरजेचे आहे . त्याअनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी सोमवार दिनांक ४ जानेवारीला प्रत्यक्ष पाहणी करीत शैक्षणिक सुविधा व कामकाजाचा आढावा घेतला . कॅम्प स्थित जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक शाळा उर्दू कन्या अमरावती येथील संलग्न असलेले उर्दू माध्यमांचे मुलींचे वसतीगृह सन १९३६-३७ साली स्थापन झाले आहे.
सुरुवातीला भाड्याच्या घरामध्ये चालविण्यात येणारे हे वसतीगृह वर्ष १९८६ पासून उर्दू कन्या शाळेच्या इमारतीत सुरू करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारामध्येच वर्ष १९८९ मध्ये उर्दू माध्यम मुलींचे वसतीगृहासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. शिक्षण संचालनालयाकडून प्राप्त अनुदानावर हे वसतीगृह चालत असे. मात्र अलीकडच्या काळात अनुदान न मिळाल्याने तसेच अनेक पदे रिक्त असल्याने अशा विविध कारणास्तव उर्दू माध्यम मुलींचे वसतीगृह बंद पडले . त्यामुळे जिल्हा व जिल्हा बाहेरून अमरावती शहरातील विविध शाळा – महाविद्यालयात उर्दू माध्यमातील शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित मुलींना निवासी व शैक्षणिक सुविधांबाबत अडचणी येत आहे . याबाबीकडे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शिक्षक संघटनेचे अब्दुल राजिक हुसेन तसेच जमियत उलेमा अमरावती चे हाफिज नाजिमुद्दीन अन्सारी यांनी आमदार सुलभाताई खोडके यांचे यावेळी लक्ष वेधले . या सोबतच वसतीगृहाची स्थापना, इमारत, कार्यपद्धती, आदि बाबींना घेऊन शालेय मुख्याध्यापक सय्यद राजीक सय्यद गफ्फार द्वारे यावेळी पूरक माहिती देण्यात आली. तसेच वसतीगृह बंद होण्याची करणे, मंजूर पदे, व्यपगत पदे तथा पदे व्यपगत होण्याची कारणे आदीबाबतसुद्धा आमदार महोदयांना अवगत करण्यात आले. मुस्लिम – अल्पसंख्यांक समाजाची मागणी लक्षात घेता तसेच उच्च शिक्षणाकरिता येणार्या मुलींचे सुरक्षिततेसाठी वसतीगृहाची निकडीच्या गरजेला घेऊन यावेळी उपस्थितांचे वतीने आमदार महोदयांना निवेदन देवून अवगत करण्यात आले. सदर वसतीगृह आगामी शैक्षणिक सत्रात सुरू करण्याकरिता आपण प्रयत्नरत असल्याचे सांगत सुलभाताईंनी उपस्थितांना आश्‍वस्त केले . तसेच कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यासह सदर वसतीगृह सुरू करण्याकरिता राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ व अल्पसंख्यांक व कौशल्य विकास मंत्री नवाब मालिक यांच्याकडे हा मुद्दा रेटून धरून मार्गी लावणार असल्याचा विश्‍वास आ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *