• Mon. Jun 5th, 2023

आरोग्य विभागातील पदभरती जानेवारीपर्यंत पूर्ण करा-राजेश टोपे

ByBlog

Jan 1, 2021

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपयर्ंत पूर्ण करावी, असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधीत विभागाला दिले आहेत. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने आता नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. तसेच कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक असून नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. आरोग्य विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील, सहआयुक्त डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेत यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून आता राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरु करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्याचे राष्ट्रीय कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी संनियंत्रणाची प्रणाली विकसित करावी. जेणेकरुन प्रत्येक अधिकार्‍याचे कार्यमूल्यमापन करता येईल. यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे निर्देशही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *