• Sun. Jun 4th, 2023

अमरावतीत कोरोना लस पोहोचली

ByGaurav Prakashan

Jan 14, 2021

अमरावती : कोरोना लस बुधवारी मध्यरात्री अमरावती येथे येऊन पोहोचली. सध्या सुमारे 17 हजार लसींचा डोस प्राप्त जिल्ह्याला प्राप्त झाला असून, तो शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. दि. 16 जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार असून, त्यात सर्वप्रथम हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे.
लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून काल रात्री दोन वाजता जिल्ह्यात येऊन पोहोचले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही सकाळी लसवाहिका व शीतसाखळी केंद्राची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या अनेक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

    लसीकरणासाठी यंत्रणा सुसज्ज

कोरोनाविरुद्ध सगळ्या स्तरांवर जवळजवळ वर्षभर लढाई सुरु आहे. आता हा लढा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. लस प्राप्त झाल्यामुळे एक महत्वाची उपलब्धी झाली आहे. लसीकरणाच्या शुभारंभदिनासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.

    शनिवारी पाच ठिकाणी होणार लसीकरण

लसीकरणाच्या शुभारंभासाठी शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण केंद्राच्या संख्येत नव्याने बदल करण्यात आला आहे. आता पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर शुभारंभदिनी लसीकरण होईल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी 500 लाभार्थ्यांना लस दिली जाईल. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक असते. त्यानुसार संबंधित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शुभारंभ दिनानंतर शासनाच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील इतर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होईल, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले.

    आरोग्य यंत्रणेने केले स्वागत

कोरोना प्रतिबंधक लस मकरसंक्रांतीच्या पर्वावर लस येऊन पोहोचली याचा आनंद व्यक्त करत आरोग्य विभागातील महिला अधिकारी- कर्मचा-यांनी हॅपी टू व्हॅक्सिनची रांगोळी रेखाटून स्वागत केले. गत वर्षभर ही सर्व मंडळी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अहोरात्र योगदान देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *