• Thu. Sep 28th, 2023

अंधश्रद्धा तसेच मांत्रीकविद्या पैसे कमविण्याचं साधन…!

ByGaurav Prakashan

Jan 19, 2021

अलिकडे विज्ञान वाढीला लागले आहे. लोकं आता चंद्र, सुर्याला देव मानत नाहीत. कारण आज चंद्र,सुर्य कोण आहेत.त्यावर काय आहे.हे सिद्ध झालंय.आज देव दगडात नाही तर माणसात आहे हेही सिद्ध झालंय.इच्छा व्रत केल्यानं पुर्ण होत नाहीत,तर कार्य केल्यानं पुर्ण होतात हेही सिद्ध झालंय.तरीही काही माणसं अशाच दगडात देव शोधत असतात.नव्हे तर त्याच दगडावर भाव म्हणून कोंबडा,बकरा बळी म्हणून देत असतात.काही ठिकाणी भाव म्हणून मेंढे व रेडेही कापतात.तर काही ठिकाणी चक्क माणसाचाही बळी देतात.अशी कित्येक नरबळीची उदाहरणे घडलेली आहेत.गुप्त धन मिळते म्हणून काही लोकं चक्क लहान लहान बालकाचा बळी देत असतात.स्वतःचे मायबाप सुद्धा अशावेळी कोंबडा,बकरा बळी न देता आपल्या स्वतःचा लेकरु बळी देत असतात.
पुर्वी यज्ञात वा होमहवनात पशूबळी देण्याची प्रथा होती.लोकं अशा यज्ञात गाय व घोडा बळी देत असत.काही ठिकाणी वेगवेगळे प्राणीही बळी देत.या सर्व अंधश्रद्धा होत्या.एवढंच नाही तर पती निधनानंतर त्या पतीच्या शय्येवर त्याची पत्नी सती जात असे.ही देखील क्रुर प्रथा अस्तित्वात होती.देवदासी,केशवेपण,बालविवाह,विधवा विवाह बंदी ह्या सर्व कुप्रथाच नाही तर अंधश्रद्धा होत्या.एखाद्या वेळी मांजर किंवा कुत्रा आडवा जाणे ही देखील अंधश्रद्धा होती.घुबडाचे ओरडणे,वटवाघुळ दिसणे,टिटवी ओरडणे,सकाळी कावळा दिसणे,कावळ्याचे काडी पकडणे ह्या सर्व अंधश्रद्धाच होत्या.
पृथ्वी सपाट असून आपण पुढे गेलो तर पडून जावू असे म्हणणारे लोकं त्यांनी चक्क पृथ्वी गोल आहे असे सांगणा-या गँलिलिओला ठार केले.नव्हे तर या अंधश्रद्धेला जो जो उजागर करीत होता.त्याला त्याला लोकांनी विरोध केला नव्हे तर आजही लोकं अशा काही ज्या अंधश्रद्धा आजही अस्तित्वात आहेत.त्याला त्याला विरोधच करीत आहेत.
दरवाज्याला लिंबू लटकवीणे,तांत्रीक साधना करुन घेणे,गळ्यात किंवा हातात गंडे दोरे,धागे
, बांधणे,ताईत बांधणे या समाजात रुजलेल्या अंधश्रद्धा………एखादं भुत अंगाला झोंबलं,असे सांगून मांत्रीक किंवा तांत्रीक मंडळी तंत्रसाधना करुन घेत.आजही तशा प्रकारचे प्रकार ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही काही प्रमाणात दिसून येतात.आजही काही लोकांच्या अंगात भुत येतो.तर काही लोकांच्या अंगात देव येतो असं भासवून पैसा उखळण्याचं काम लोकं करीत असतांना दिसतात. “तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक भुत लागला.” असं सांगून शुद्ध फसवणूक करणारे महाभाग काही या देशात कमी नाहीत.म्हणून या अंधश्रद्धांबाबत सांगायचं झाल्यास या अंधश्रद्धा म्हणजे पैसे कमविण्याचे साधन आहे.
पुर्वी जादूटोणा,ठोकाठमका,दिठ,नजर लागणे,अंगात भुत येणे या गोष्टी सर्रास सुरु होत्या.आजही त्या सुरु आहेत.त्याचे प्रमाण आज थोडे कमी आहे.ही नजर लागू नये म्हणून आजही ही नजर काढण्याचे प्रकार होतात.लहान बाळाला साधा जंताचा जरी त्रास असेल आणि पोट दुखत असेल,तरी नजर लागली असं समजून ती नजर काढली जाते.त्यानंतर गळ्यात ताईत किंवा एखादा धागा घालून दिला जातो.परंतू असा सारखा पोट दुखत असेल,तर कोणीतरी तुमच्यावर नक्कीच करणी केली असं सांगीतलं जातं.तसेच काही संकटं जर वारंवार येत असतील तर घराची बांधणूक करा. असं सांगीतलं जातं.यात मांत्रीक मंडळी अतोनात पैसा कमवीत असतात.
सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख येत असतं.कधीकधी तर संकटं एकावर एक येत असतात.यामध्ये कोणी वास्तुदोष दाखवीत असतात.तसेच कोणी ‘पैसे तुमच्याजवळ टिकत नाही,अमुक यंत्र घ्या,पैशात वाढ होईल.’ असं सांगून अंधश्रद्धा पसरवीत असतात.नव्हे तर यातूनही पैसा प्राप्त करणे हा उद्देश असतो.
अलिकडे टिव्हीच्या माध्यमातून तसेच वर्तमानपत्रातून वाईट नजरेपासून वाचविणा-या अशा प्रकारच्या यंत्रांची सर्रास जाहिरात करुन विक्री केली जात आहे.तसेच या वस्तुस्थितीस सामान्य माणूस बळी पडत आहे.अगदी विज्ञान प्रगतीपथावर असतांनाही.आजही काही ठिकाणी मुलं पैदा होणं निव्वळ देवाची किंवा अल्लाची देण समजलं जातं. ज्यांना मुलं लवकर राहात नाही ते,नवशही करीत असतात.मग नवश केल्यानंतर एखाद्या वेळी कावळा फांदीवर बसल्यागत व फांदी तुटल्यागत मुलं झालीच,तर त्याला देव पावन झाला असा भाव मनात प्रगट करुन अंधश्रद्धेवर शिक्कामोर्तब होतो.नव्हे तर तो नवश पुर्ण करण्यासाठीही पैसा खर्च केला जातो.या नवसात नाहकच निष्पाप कोंबड्या बक-याचा जीव जातो. भुत अंगात येणे,भुत झोंबणे,देव अंगात येणे,तंत्र,मंत्र ह्या सा-या अंधश्रद्धा.देवाजवळ एवढी सवड नसते की तो अंगात येईल.तसेच भुताला एवढी गरज नाही की तो माणसाच्या अंगात येईल.तरीही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा प्रसवल्या जातात.अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घातलं जातं. महत्वपूर्ण गोष्ट अशी की ह्या प्रकारच्या अंधश्रद्धा ह्या निव्वळ पैसा कमविण्यासाठी निर्माण केलेल्या असून ह्या अंधश्रद्धांचा उपयोग करुन कोणीही फसू नये.असल्या अंधश्रद्धांवर कोणीही विश्वास करु नये.तसेच आपल्या चांगल्या सुरळीत आयुष्याचा सर्वनाश करु नये.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०
    ‘गौरव प्रकाशन’ वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही भारतीय राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘गौरव प्रकाशन’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
    -संपादक व प्रकाशक
    गौरव प्रकाशन