Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

आमची करजगांवची शाळा...!

आमच्या शाळेची स्थापना 1952 साली हे आपणास ज्ञात असेलच, शाळेचे पूर्वी नाव देशी पूर्व माध्यमिक शाळा, करजगांव असे होते. कालांतराने शाळेचे नाव उच्च प्राथमिक मराठी शाळा असे नामांतर झाले. शाळेत सुरुवातीच्या काळात आदरणीय गुरूवर्य सर्वश्री सदाशिव गोविंदराव भोयर, मोतीरामजी श्रीमलजी आठवले, नथ्थुसिंग प्रभुसिंग चव्हाण, गोपिनाथ दौलतराव ढगे, शेषराव धनंजयआप्पा बेंद्रे, नवरे, अंबादास बळवंतराव पेठकर, अनिल काशीनाथराव रुद्रकार, नरेंद्र नरसाजी वानखडे, अलीकडे प्रकाश दशरथ भगत, सुरेश कडू, प्रकाश किसनराव राऊत, संजय सहदेवराव घडीकर, महादेव गोविंदराव निमकर, सतीश मोतीरामजी दुधे, मनोहर फकीरजी उघडे, इत्यादी शिक्षक ज्ञानदान करायचे. पिंपळगांव, तेलगव्हाण येथील विद्यार्थी ज्ञानार्जनाकरीता याच शाळेत येत होते. शाळेच्या इमारतीच्या वर्गखोल्या कमी असल्याने काही वर्ग झाडाखाली भरत असे. शाळेत मध्यान्ह भोजनाचाच एक प्रकार म्हणून प्रोटीनयुक्त मक्याचा शिरा मिळत होता. शिरा खुप चवदार लागत होता. शाळेत विद्यार्थी दशेत असताना भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे आजार होवू नये म्हणून लसीकरण व्हायचे. आम्हाला लसीकरणाची खूप भिती वाटायची लसीकरणास नर्सेस आल्या की, बरीचशी मित्रमंडळी शाळेतून धूम ठोकायची कधी लघवीला जातो म्हणून तर कधी खिडकीतून पळ काढायची मात्र गुरूजीचे बरोबर सर्वांवर लक्ष असायचे जे विद्यार्थी शाळेतून घरी पळून गेले त्यांना इतर वर्गमित्र घरून पकडून यानायचे तसे गुरुजींचे फर्मान असायचे. मग काय इंजेक्शनासोबत गुरुंजींचा महाप्रसाद घेवून रडत घरी परतावे लागे. शाळेची अवस्था नाजुक असल्याने दर शनिवारी शाळा शेणामातीचे आम्हाला सारवण करावे लागत होते. जुन्याकाळी 4 था वर्ग, 7 वा वर्ग बोर्डाच्या परीक्षा होत होत्या त्या परीक्षा मला वाटत 7 वीची आपल्या शाळेत होत होती पंचक्रोशीतील विद्यार्थी करजगांवच्या शाळेत परीक्षा द्यायला येत होते. हिवाळ्यात आम्ही शनिवारी सकाळी शाळा असली की, शेकोटी करून कधीमधी बसायचो, एकेदिवशी सपावटबंधू यांची मुलगी शेकोटीने पेट घेतला व काही प्रमाणात जळली तेव्हापासून शाळेची शेकोटी बंद झाली. विद्यार्थीदशेत पावसाळ्याच्या दिवसात गरीबीमुळे काही मित्रांना आई-वडिलांसोबत निंदायला तुंग्यात जावे लागत असे. गुरुजींची परवानगी घेवून जात होतो गुरुजी विनातक्रार परवानगी द्यायचे कारण बरेच जणांची परिस्थिती फारच नाजूक होती. श्रावण सोमवारी शाळा सकाळून असायची शनिवार, रविवार व श्रावण सोमवार असे तीन दिवस मजुरी मिळायची त्यातच आम्ही पुस्तके वह्या, लेखन इत्यादी शालेय साहित्य मजुरीच्या पैशातून घेत होतो तेच खरे स्वावलंबन होते जे आज कामी पडले. नमन या शाळेला आम्हास घडविले..! याच शाळेतून याच विद्यामंदिरातून कित्येक विद्यार्थी घडलेत. आम्ही बी ‘घडलो’े तुम्ही बी ‘घडना’ मात्र शाळेच्या होते असलेल्या अनास्थेबाबत होत असलेले दुर्लक्ष लोकप्रतिनिधीनी शाळेच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष द्यावे ही माफक अपेक्षा तूर्त एवढेच...!
    बंडूकुमार श्रीरामजी धवणे
    छाया : अर्जुन वरघट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code