सामूहिक बलात्कार पीडितेला गावाबाहेर काढले..!

औरंगाबाद : सामूहिक बलात्कार पीडितेला गावाबाहेर काढण्यात आले आहे. तिच्यावर तीन गावांनी सामाजिक बहिष्कार घातला आहे. तसा ठराव तीन गावांमधील ग्रामस्थांनी केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बीड पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.
बलात्कार प्रकरणात आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. पीडितेला गावात बंदी घातली आहे. तिच्या वर्तनामुळे गावचे नाव खराब होत आहे आणि खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी तिच्याकडून दिली जाते, त्यामुळे तिला परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचा दावा गावकर्‍यांनी केला आहे. तिन्ही गावांच्या सरपंच या महिला आहेत. महिलेला गावात प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा ठराव या गावांनी १५ ऑगस्ट रोजी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी महिलेकडून दिली जात असून, तिच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी काही गावकर्‍यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे दिले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गावकरी आणि पीडित महिला यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वितुष्ट निर्माण झाले आहे. गावांनी आपल्यावर बहिष्कार घातला असून न्याय देण्याची मागणी करणारा अर्ज महिलेने दिला असून, या प्रकरणी चौकशी सुरू असून, या प्रकरणात सत्य शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला १ जानेवारी २0१५ रोजी संध्याकाळी घरी परतत होती. एका खासगी वाहनाच्या चालकाने तिला लिफ्ट ऑफर केली. त्यानंतर चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!