• Wed. Jun 7th, 2023

सरकारने देश विकायला काढायचा, भांडवलदारांनी तो विकत घ्यायचा..!

ByBlog

Dec 26, 2020
    “No man can be grateful at the cost of his honour,no woman can be grateful at the cost of her chastity and no nation can be grateful at the cost of its liberty”

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी देशाची महत्ती विशद करताना थॉमस पेन यांचा दाखला दिला आहे.”देश म्हणजे विशिष्ट भूप्रदेश नव्हे.तर त्यातील लोक ,सर्व थरातील लोक,त्यांचे सुख,स्वातंत्र्य आणि मानवी अधिकार यांच्या साठी प्रयत्नशील असणारे कार्यकर्ते हेच सच्चे देशभक्त होत.खालच्या जातीतील आपल्या देशबांधवाना पशुपेक्षा नीच समजणाऱ्या लोकांचा देशाभिमान हा अपवित्र देशाभिमान होय.जुन्या धार्मिक परंपरेवर आधारलेल्या आपल्या राजकिय चळवळीपासून खेड्यापाड्यातील जनसमुदाय अजूनही लांबच आहे.त्याच्याशी बरोबरीच्या नात्याने वागण्याचे आपल्या देशभक्तांना अद्याप अगत्य वाटत नाही.म्हणून खरा देशाभिमान अंगी बाणवून घ्यायचा असेल तर वाँशिग्टन व लाफायत यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे.” देशाचा संपूर्ण विकास करायचा असेल तर आपआपसातील सारे भेद गाडून टाकले पाहिजे.कारण भारत देशाला जो इतिहास माहित तो खूप चांगला आहे असे म्हणता येणार नाही.इतिहासाच्या अभ्यासावरून भारतीय समाजव्यवस्थेचा व राज्यव्यवस्थेचा इतिहास पाहला तर प्रचंड विषमतेने भरलेला आहे.कारण “आपला इतिहास हा आपला वर्तमानकाळ प्रभावित करतो आणि वर्तमानकाळ हा आपले भविष्य निश्चित करतो.” व्हाल्टेअर असे म्हणतो की,”जे आपल्या जीवनकाळाचा इतिहास लिहितात ,त्यांनी जे काही लिहले आहे.त्यासंबंधात प्रत्येक व्यक्ती आक्रमण करेल अशीच अपेक्षा ठेवावी .तसेच त्या व्यक्ती जे लिहित नाही त्यासाठीही त्यांच्यावर आक्रमण होणारच आहे.परंतु जे सत्य आणि स्वातंत्र्यावर प्रेम करतो ,कशाचीही अपेक्षा करीत नाही.कोणालाही भीत नाही ,काहिही मागत नाही ,त्याने अशा क्षुल्लक बाबींमुळे निरूत्साही होऊ नये व आपले इतिहास निर्मितीच्या आणि इतिहास लेखणाच्या कार्यावर मर्यादा घालून घेऊ नये.” म्हणजेच
माणसाने इतिहास घडवितांना इतिहासाची जाणीव सातत्याने डोळ्यापुढे ठेवावी.कारण ‘जे व्यक्ती आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही ‘ असे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी प्रतिपादित केले आहे.

आज भारतीय सरकार भारताचा इतिहास विसरत चालला आहे.हे त्याच्या ध्येय धोरणावरून दिसून येते.कारण पृष्कळ लोक असे असतात की ,
त्याच्या जिवितांत विशिष्ट ध्येय नसते होकायंत्राशिवाय हाकारलेल्या निश्चित बंदर दृष्टिपथात नसलेल्या आणि वाऱ्याच्या गतिबरोबर इकडेतिकडे वाहवत जाणाऱ्या जहाजासारखी त्यांची अवस्था असते.त्याचे जीवन ध्येयशुन्य असते आणि त्यांच्या हातून जे घडते ते यद्दूच्या घडते.कोणत्याही गोष्टीबद्दल हेतुतः आंच नसल्यामुळे असे लोक काहीच साधू शकत नाही.आपल्या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर आपल्यासमोर काहीना काही ध्येय असले पाहिजे.’भारतीय राजकीय प्रवृतित ध्येय नसल्याने सध्याचे राजकारण ध्येयशुन्य झाले वाटते आणि जे घडत आहे ते फक्त याद्दृकच्छिक घडत आहे असे वाटते.

भारताचा इतिहास हा रक्तरंजित असाच राहला आहे.आर्य -अनार्य यांच्या संघर्षातून देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया झाली होती.परंतु अनार्याच्या कार्यकर्तृत्वाने अनेक ठिकाणी आपले राज्य अबादित ठेवले होते.भारतात अनेक राजे महाराजे होऊन गेले पण भारतीय राजसत्तेेवर धर्माचा असलेला प्रभाव कमी झाला नाही . धर्माच्या नावाखाली अनेक प्रकारचे कुटील कारस्थान करून भारतीय जनतेला गुलाम करून सोडले.वाईट चालीरीती आणि मानवाला दिलेले पशूतुल्य जीवन यामुळे त्यांचे जगणेच असह्य करून सोडले आणि याला कारण कोणते तर देशातील धार्मिक कायदा ,देशाचा हा कायदा बदलता येत नाही .अशी खोटी दर्पोक्ति असल्याने माणसाला पशूतुल्य जीवनाला बाद्य करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा कायद्याविषयी म्हणतात की,’ह्या देशात जितक्या क्रांत्या झाल्या आहेत तितक्या पृथ्वीतलावरील कोणत्याही राष्ट्रात झालेल्या नाहीत ,पोपचे वर्चस्व झूगारून देण्यासाठी युरोपात जेव्हा झगडे झाले त्याच्या आधी कित्येक वर्षे हिंदूस्थानात धर्माधिष्टित कायदा विरूध्द धर्मनिरपेक्ष कायदा असा झगडा चालू होता.दुर्दैवाने हिंदूस्थानात धार्मिक कायदा श्रेष्ठ ठरला.माझ्यामते ती एक मोठी आपत्ती ओढवली कायद्यात बदल करता येत नाही असा समज हिंदू समाजातील प्रतिगामी लोकांमध्ये त्याकाळी होता हेच ही आपत्ती ओढवण्याचे कारण आहे असे मला वाटते.’यासारखी परिस्थिती भारतात निर्माण झाली असून , अंधभक्त संविधान व्यवस्थेला सुरूंग लावून धार्मिक कायदा श्रेष्ठ याप्रकारची विष पेरणी करीत आहेत.भारतीय समाजाच्या व्यवस्थेतील उत्तम कालखंड सम्राट अशोककालीन होता.कलिंग युध्दानंतर भारतात एक नवयुग निर्माण झालं.युध्दातील सैनिकाचे पडलेले रक्तरंजित शरीरे पाहून त्यांना गहीवरून आले .आपण हे काय केले ? या विषयी दुःख वाटले .त्या नंतर त्यांनी जगात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी पुढाकार घेतला .जगाला गतिमान करणारा समता,बंधुभाव,न्याय व स्वतंत्रता प्रस्थापित करणाऱ्या बुध्द् धम्माचा स्वीकार करून धम्माप्रमाणे आचरण ठेवले कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही तर सर्वांना समान मानले.मानवाच्या विसाबरोबर पर्यावरण व पशूपक्षी प्राणी यांच्या जीवनासाठी नवीन कार्य प्रणाली तयार केली . बुध्द् धम्माच्या नीतीतत्वाने सर्वांना योग्य न्याय दिला.म्हणून त्यांचे कार्य जगाला प्रेरणा देत आहे.

सम्राट अशोकानंतर या घराण्याला योग्य कर्तबगार राजे मिळाले नाही , ब्राम्हणाच्या कुटील कारस्थानाने शेवटचा ब्रुहदत्त राजा मारला गेला .यानंतर राजसत्तेेवर धर्माचा प्रभाव वाढला.जेव्हा जेव्हा राजसत्तेेवर धर्मवादाचे वर्चस्व तयार होते तेव्हा तेव्हा धर्मसत्ता श्रेष्ठ ठरते हे इतिहासावरून दिसून येते .यावर भाष्य करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”जेव्हा जेव्हा राजसत्तेेचे नियंत्रण धर्म सत्तेकडे गेले तेव्हा तेव्हा राजकिय सत्ता विकलांग आणि दुबळी झाल्याचा इतिहास आहे.भारतातील दोन्ही धर्मसमुदाय परस्परांकडे धार्मिक द्वेषभावनेने पाहतात.हे नव्याने सांगण्याची गरज नाही.हिंदू असो वा मुस्लिम असो हे दोन्ही देशाकडे धर्मराष्ट्र म्हणूनच पाहतात.ते आता लपून राहिलेले नाही .देशातील सर्वाधिक अंशाततेचे कारण या दोन्ही धर्मसमर्थक राजकिय नेत्यानी निर्माण केलेली भावना आहे.राजकिय दृष्ट्या देशाचा कारभार एका विशिष्ट जात राजसत्तेेवर असते तेव्हा ती आपल्या ध्येय धोरणावर आधारीत प्रणाली लागू करतो हे देशाला धोकादायक आहे. हा मार्मिक संदेश भारतीय जनता जेवढ्या लवकर समजेल तोच सूदिन म्हणावा लागेल कारण आत्ताचे सरकार धार्मिक कट्टरवादाच्या हातात आहे .त्याच्या ध्येय धोरणावरून असे निर्देशित होते की ते संवैधानीक भूमिका सोडून आपल्या पक्ष सिध्दांतानुसार कारभार चालवत आहे.
भारतीय समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था एकोप्याने राहात नसल्याने भारतीय समाजव्यवस्था काही काळ प्रभावी राहल्या तर काही काळ खिळखिळ्या झाल्या.या असंतुष्टीचा फायदा फितुरवादीवृत्तीने घेतला.त्यांनी फोडा व राज्य करा या तत्वाने भारताला गुलाम केले.धर्म ,जाती, भाषा,यांची विषम व्यवस्था तयार करून स्वःहीत जपलं.भारताला सतत गुलामगिरीतचं ठेवलं.वैयक्तिक स्वार्थ , फँसिस्टवृत्तीने देश अंधकारमय युगात भरकडत गेला.अशाप्रकारच्या प्रवृत्तीने विषमतेची बीजं पेरून ठेवल्याने आजही या बीजाचे रोपटे कधी कधी डोके काढून भारतीय समाजाला देशापासून तोडण्याचा प्रयत्न करतांना दिसते.

मध्ययुगाच्या अंधःकारमय युगातून प्रबोधनयुगाचा प्रारंभ झाला आणि रूढीजन्य आंधळ्या डोळ्याचे मोतिबिंदू गळून पडले . नव्या परिवर्तनवादी विचारांचे लोन जागतिक क्षितीजावर प्रकाशू लागले त्याचे तेज भारतावर पडू लागले.वैज्ञानिक क्रांती घडून आल्याने .दळणवळणाच्या साधनसुबत्तेने नवे विचार , नव्या कल्पना,नवे दृष्टीकोन यांचा प्रसार झाला.वैज्ञानिक ज्ञानाने धार्मिक कपोलकल्पित ग्रंथाची समीक्षा होऊ लागली .

समाजसुधारकांच्या परिवर्तनच्या क्रांतीने समाजात नवचैतन्य आले.धार्मिकग्रंथाची फोलपणा समजून आले.मनुस्मृतीमधील अमानवीय विचार समजू लागले .समाज नव्या लढाईसाठी तयार झाला.
भारतामध्ये आलेल्या व्यापारांनी भारतातील फुटीरवादी धोरणाचा फायदा घेतला .स्वतःचे राज्य स्थापन केले .नवीन नौकऱ्या तयार करून स्वतःचे साम्राज्य मजबूत केले . भारताच्या क्रयशक्तीवर स्वतःचा व आपल्या देशाचा विकास केला.ब्रिटीशांनी भारतातील पारंपारिक कायदे नष्ट करून नव्या कायद्याची निर्मिती केली.नव्या शिक्षणाचा पाया घालून बहुजनाच्या शिक्षणाला ओनामा केला.या शिक्षण क्रांतीतून राजा राममोहन रॉय,नाना शंकर शेट,महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले,सयाजीराव गायकवाड,दादाभाई नौरोजी,गो.ग .आगरकर,राजर्षीशाहू महाराज,सय्यद अहमद खान,विठ्ठल रामजी शिंदे,गुरू नारायन,आयोथीदास,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वाईट परंपरेवर आघात करून सर्व माणसाला समान मानावे.हा मुलमंत्र दिला.शिक्षणाच्या क्रांतीने भारतीय समाजात नवचैतन्य निर्माण झाले.लोकशाही विचाराची क्रांतीजाणिवा लोकांत निर्माण झाली.थॉमस जेफर्सनच्या जाहीरनाम्याची भारताला आेळख झाली .ते म्हणतात की,”We hold these truths to be self evident; that all man are created equal ; that they are endowed by their created with certain unalienable right.that among these are so life,liberty and the pursuit of happiness that secure these,right Government are instituted among men deriving their just power from the consent of the governed.”

या जाहिरणाम्यामुळे जगातील अनेक देशात मानवमुक्तीच्या लढाया सुरू झाल्या . भारतीय समाज इंग्रजाच्या गुलामगिरीच्या खाईत लोटला होता.ब्राम्हणवादी ग्रंथाची गुलामी कमी होऊन नव्या गुलामीचे जंजीर निर्माण झाले होते.मानवाचे मन गुलाम झाले होते.स्वातंत्र्याची कोणतीही किरण दिसत नसतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चशिक्षण घेऊन ज्ञानाच्या साऱ्या कक्षा पादाक्रांत केल्या पण सनातनी धर्म विचारांने त्यांना पदोपदी छळले.डॉ.बाबसाहेब आंबेडकरांना राजकिय स्वातंत्र्यापर्वी आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळायला हवे .असे त्याचे मत होते.देशातील अस्पृश्य बांधवाना त्याचे नैसर्गिक अधिकार मिळावे.त्याना राजकिय कारभारात प्रवेश द्यावा यासाठी त्यांनी सायमन कमिशन,गोलमेज परिषदेत युक्तीवाद केला . अस्पृश्य बांधवाना अधिकार मिळवून देणारा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य,समता , बंधूभाव व न्याय यावर आधारीत विचाराची पेरणी भारतात केली.

भारताला नवी लोकशाही समाजवादी समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था दिली .भारत सर्वभौम प्रजासत्ताक झाले .पण आजही समानतेचा हक्क सर्वांना मिळत नाही.भेदाभेद,जातीयवाद याचे नेहमी तंटे सुरू असतात हे दुःखदायक आहे.देशात संविधान असून त्यांची योग्य अंमलबजावनी होत नाही.सर्व मानवाला समान अधिकार देणाऱ्या संविधानाला खुंंटीवर अडकवून ठेवण्यात आले आहे.देशात आज जे सरकार कार्यरत आहे हे सरकार संविधानात्मक ढाचा उध्दवस्त करीत आहे.आदिवासी ,शोषित,कामगार,शेतकरी ,स्त्री, मागासवर्गीय , अल्पसंख्यांक यावर अन्याय करीत आहे.लोकशाहीचे वस्त्रहरण करून जुन्या मनुस्मृतीनुसार कारभार चालवत आहे.त्यामुळे भारतीय प्रजासत्ताक धोक्यात आले आहे. या सरकारने विकासाच्या नावावर भांडवलदारांच्या फायद्यासाठी नवीन कायद्याची निर्मिती केली आहे.लॉकडाऊनने भारतीय कामगार व श्रमीक वर्गाचे अगणित हाल केले.भारताचे दोन शत्रू आहेत एक भांडवलशाही व दुसरी ब्राम्हणशाही या दोन्ही शाहीचे उच्चाटण होत नाही तोपर्यंत भारतीय समाजाला विकास करता येणार नाही.

जागतिकीकरण , उदारीकरण,खाजगिकरण यांनी देशाला गुलाम केले असून नव्या हुकूमशाही तंत्राची नवी गुलामगिरी तयार झाली आहे.या गुलामगिरीला देशातील तरूणच नेस्तनाभूत करू शकतो.पण आजचा तरूण मोबाईलच्या आहारी जाऊन स्वतः व देशाला गुलाम करण्यासाठी मदत करत आहे हे धोक्याचे आहे.तरूणांनी आतातरी आपले ध्येय लक्षात घ्यावे व राजकीय परिवर्तनासाठी सज्ज राहावे.
देशातील मुख्य समस्येला बगल देऊन धार्मिक असहिष्णूतेचा व्युव्हरचक्र तयार करून लोकांना भ्रमिष्ठ करून स्वतःचा राजकिय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न सरकार करते . देशातील अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या हातात देऊन देशाला आज विकल्या जात आहे.सरकारी कंपन्या कवडीभावाने भांडवलदारांच्या घशात टाकल्या जात आहेत. देश कोरोनाच्या महामारीने ग्रस्त असतांना सरकारने सर्व लोकांना दुःखाच्या खाईत लोटले आहे.बेरोजगाराचे तांडे निर्माण झाले आहेत.अनेक लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.सर्व शाळा बंद आहेत.कामगाराचे बेहाल सूरू आहेत.मीडिया सरकारची चापलूसी करण्यात मग्न आहे. सामान्य लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.जाती धर्माचे काळे ढग जमा झाले आहेत.तरूणांच्या हाताला काम नाही . सरकारने देश विकायला काढला असून भांडवलदारांनी तो विकत घ्यायचा चंग बांधला आहे.या षडयंत्राला ओळखून क्रांतीची तलवार व्हायचे आहे.देश वाचवायचा असेल तर संविधानविरोधी सरकारला उखळून फेकले पाहिजे.यासाठी तरूणाने कंबर कसावी हीच ईच्छा आहे.कारण आपणच देशाला वाचवू शकतो..!

    -संदीप गायकवाड
    Mob N.९६३७३५७४००
    (वेब साईट प्रकाशित मताशी संपादक सहमत असेलच असे नाही सदर मत लेखकाचे समजावे- संपादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *