• Sun. May 28th, 2023

संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राची यादी सादर करावी- जिल्हा निवडणूकअधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश

ByBlog

Dec 20, 2020

अमरावती : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने मतदान यंत्रे, मतदान केंद्रांची निश्चिती, वाहतूक आराखडा, आरोग्य पथके, मनुष्यबळ व पोलीस बंदोबस्त आराखडा आदी कामांना वेग देण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पुरेसा बंदोबस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याची यादी सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उदयसिंह राजपूत, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, मनीषकुमार गायकवाड, राम लंके, तहसीलदार अभिजित जगताप, किशोर गावंडे, धीरज स्थूल, राजेंद्र इंगळे, अतुल पाटोळे, संतोष काकडे, योगेश देशमुख, वैभव फरतारे, नीता लबडे, माया माने, जी. एम. संगारे आदी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, मतदान केंद्रांची निश्चिती करून यादी तत्काळ सादर करावी. केंद्रावर रॅम्प, पेयजल, वीज, आरोग्यपथक, प्रसाधनगृहे व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसंबंधी आवश्यक दक्षता साधने उपलब्ध असावीत. निवडणूक निर्णय अधिकारी, झोन संख्या, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी आदी बाबी निश्चित करून जिल्हा निवडणूक प्रशासनाला कळवावे. मतदानासाठी यंत्रे आदी वाहतुकीसाठी आवश्यक बसेस, जीप, ट्रक आदींची मागणी तत्काळ नोंदवावी. मतदान केंद्राच्या संख्येनुसार पोलीस बंदोबस्त आराखडा, मतमोजणीसाठी बंदोबस्त आराखडा सादर करावा. संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त असणे आवश्यक आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीसाठी दहा टक्के वाढ लक्षात घेऊन 1 हजार 823 प्रभागासाठी एकूण 2 हजार 110 मतदान केंद्राची संख्या विचारात घेऊन त्यानुसार आवश्यक मतदान यंत्राची मागणी निवडणूक आयोगास नोंदविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करावे. ईव्हीएमबाबत प्रशिक्षण व मतदार जागृती अभियान राबविण्यात यावे.
निवडणूक निकाल घोषित झाल्यापासून तीस दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब संबंधित उमेदवारांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबत काटेकोरपणे कार्यवाही होणे आवश्यक आहे, असे श्री. सिद्धभट्टी यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयात मतदान छाननीच्या दिवसापर्यंत तपासणी शिबिराचे आयोजन करून सर्व संबंधितांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या
निवडणूक प्रक्रियेवर आयोगाच्या वतीने देखरेख ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिका-यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी जारी केला. अमरावती तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड, भातकुली व तिवस्यासाठी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वरसाठी उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, दर्यापूर व अंजनगावसाठी उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, अचलपूर व चांदूर बाजारसाठी धारणीच्या उपविभागीय अधिकारी मिताली सेठी, मोर्शी व वरूडसाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, धारणी व चिखलद-यासाठी उपजिल्हाधिकारी राम लंके यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *