• Sat. Jun 3rd, 2023

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन छेडणार

ByBlog

Dec 25, 2020

अहमदनगर : सरकार फक्त पडण्याला घाबरते, सरकारला तीच भाषा समजते, त्यामुळे पक्ष कोणतेही असो, जनजागृती करून जनता रस्त्यावर उतरली तरच शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य होणार आहेत. त्यासाठीच लवकरच आपण दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. रामलीला मैदान आंदोलनासाठी मिळावे म्हणून आपण दिल्ली कमिशनर यांना परवानगी मागितली आहे. साधारण महिनाभरात रामलीला मैदानावर आपण आंदोलन सुरू करू, असेही अण्णा म्हणाले.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी, कृषी माल, दूध, फळे, भाजीपाल्यासह सी-टू प्लस फिफ्टी प्रमाणे हमीभाव, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र संवैधानिक दर्जा आणि स्वायत्तता या प्रमुख मागण्यांसाठी अण्णांनी गेल्या चार वर्षांत दिल्लीतील रामलीला मैदान आणि त्यानंतर राळेगणसिद्धी येथे आंदोलने केली होती.
२0१८ आणि २0१९ ला केलेल्या या आंदोलनात केंद्रीय तसेच राज्यातील तत्कालीन कृषीमंत्री, मुख्यमंत्री यांनी मनधरणी करून आंदोलन मागे घ्यायला लावले. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या संमतीने पीएमओ, कृषीमंत्री आदी विभागांनी आश्‍वासन देत सर्व मागण्या मान्य केल्याचे लिखित दिले. मात्र, आता दीड वर्षे उलटले तरी कोणत्याही आश्‍वासनाची अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उद्विग्न मनाने पुन्हा बेमुदत उपोषण करणे भाग पडत असल्याचे अण्णांनी खेदाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *