• Sun. May 28th, 2023

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 82.91 टक्के मतदान

ByBlog

Dec 1, 2020

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी 82.91 टक्के अशी आहे. त्यानुसार सायंकाळी पाचपर्यंत एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 29 हजार 534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर मतदान झाले. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावर आरोग्य तपासणी पथके नियुक्त करण्यात आली होती. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर व आवश्यकता पडल्यास पीपीई कीट आणि विलगीकरण कक्षाची व्यवस्थाही सर्व केंद्रांवर करण्यात आली होती.
विभागातील पाचही जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लावायला सुरुवात केली होती. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या रांगांत व्यक्ती-व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मार्किंग करण्यात आले होते.
मतदान आकडेवारीनुसार, सकाळी दहा वाजेपर्यंत 10.11 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 25.11 टक्के, दोन वाजेपर्यंत 46.71 टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत 68.65 टक्के मतदान झाले. अमरावती विभागात एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 26 हजार 60 पुरूष तर 9 हजार 562 स्त्री मतदार आहेत. त्यातील 21 हजार 865 पुरूष, तर 7 हजार 669 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी पाचपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 10 हजार 386 मतदारापैकी 5 हजार 813 पुरूष आणि 2 हजार 601 स्त्री अशा 8 हजार 414 मतदारांनी मतदान केले. अकोला जिल्ह्यातील 6 हजार 480 मतदारांपैकी 3 हजार 625 पुरूष आणि 1 हजार 751 स्त्री अशा 5 हजार 346 मतदारांनी मतदान केले. वाशिम जिल्ह्यातील 3 हजार 813 मतदारांपैकी 2 हजार 755 पुरूष आणि 560 स्त्री अशा 3 हजार 315 मतदारांनी मतदान केले. बुलडाणा जिल्ह्यातील 7 हजार 484 मतदारांपैकी 4 हजार 801 पुरूष आणि 1 हजार 286 स्त्री अशा 6 हजार 87 मतदारांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील 7 हजार 459 मतदारांपैकी 4 हजार 871 पुरूष आणि 1 हजार 501 महिला अशा 6 हजार 372 मतदारांनी मतदान केले.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
अमरावती – 81.01 टक्के, अकोला – 82.50 टक्के, वाशिम – 86.94 टक्के, बुलडाणा – 81.33 टक्के,
यवतमाळ – 85.43 टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *