• Sat. Jun 3rd, 2023

मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन

ByBlog

Dec 27, 2020
    हजारो लोकांच्या उपस्थितीत शहिद कैलास दहिकर यांना भावपूर्ण निरोप
    पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित

अमरावती, दि. 27 : हिमाचलात कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या कैलास दहिकर यांना आज हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे व जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी शहिद दहिकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून शहिद दहिकर यांना सलामी देण्यात आली.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी पुष्पचक्र वाहून शहिद कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली.
अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हे कुलू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते. रात्री रॉकेल हिटरमुळे टेंटला आग लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शिमला- चंदीगड येथून दिल्ली व दिल्लीहून विमानाने नागपूर येथे व नागपूराहून सैनिकांच्या दलासह पिंपळखुटा येथे आणण्यात आले. शहिद दहिकर यांना वंदन करण्यासाठी पिंपळखुटा गावासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. अचलपूर व परिसरातील गावांतून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा भारतमातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. ‘भारतमाता की जय’, ‘शहिद कैलास दहिकर अमर रहे’ अशा घोषणा देत पिंपळखुटा येथे हजारो नागरिक जमले होते.
सैन्यदलाच्या वाहनात शहिद दहिकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यावेळी कुटूंबीय व आप्त यांचा शोक अनावर झाला होता. त्यानंतर अग्निविधीसाठी गावालगत तयार करण्यात आलेल्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले. सैन्यदल व पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. शहिद दहिकर यांच्या वीरपत्नी बबलीताई कैलास दहिकर यांना सैन्यदलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. शहिद दहिकर यांचे बंधू केवल यांनी दहिकर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले.

    भूमीचा गौरव वाढवणारा वीर – पालकमंत्री ऍड. ठाकूर

शहिद कैलास दहिकर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या सुपुत्राने येथील भूमीचा गौरव वाढवला आहे. दहिकर परिवाराची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे. आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी साहाय्य करू, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
सातपुड्याच्या कुशीत वाढलेला मेळघाटच्या शूर सुपुत्राला हिमालयाच्या कुशीत वीरमरण आले. शहिद कैलास दहिकर यांचा त्याग व बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे, अशी भावना राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केली.खासदार श्रीमती राणा, गावाचे सरपंच गजानन येवले आदींनीही यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *